गुजरातमध्ये बलात्काऱ्याला फाशी

गांधीनगर – गुजरातमधील सूरत शहरात गेल्या महिन्यात एका चार वर्षीय चिमुकलीसोबत प्रचंड संतापजनक कृ त्य करण्यात आले होते. आरोपीने चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या केली होती. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत न्यायालयाने आरोपीला मंगळवारी फाशीची शिक्षा सुनावली. बलात्कार आणि महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये घट व्हावी, यासाठी गुजरातच्या पोलीस यंत्रणेसह न्याय व्यवस्थेच्या या कार्यप्रणालीवर समाधान व्यक्त करण्यात आले आहे. कारण घटनेच्या अवघ्या एक महिन्यांतच आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. गुजरातच्या कारवाईच्या या मॉडेलचा प्रत्येक राज्याने अंगीकार केला पाहिजे, तरच पीडितांना न्याय मिळेल, अशी भावना सर्वसामान्यांकडून व्यक्त केली जात आहे.
संबंधित घटना सूरत शहरात ४ नोव्हेंबरला घडली होती. आरोपीने अवघ्या चार वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केला होता. त्यानंतर तिची हत्या केली होती. त्यामुळे संबंधित परिसरात एकच खळबळ उडाली होती. या घटनेमुळे संपूर्ण शहर हादरले होते. नागरिकांनी या घटनेप्रकरणी आरोपींना लवकरात लवकर पकडून पीडितेला न्याय मिळावा, अशी मागणी केली होती.
पोलिसांनी या भयानक घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन कारवाई सुरू केली होती. घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर मिळालेले पुरावे आणि इतर माहितीच्या आधारावर पोलिसांनी आरोपीच्या तातडीने मुसक्या आवळल्या होत्या. त्यानंतर पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्याने आपला गुन्हा कबूल केला होता. आरोपीला पकडल्यानंतर नागरिकांनी या प्रकरणातील संबंधित खटला जलदगती न्यायालयात चालवावा, अशी मागणी केली होती.
पोलिसांनी आरोपीला पकडल्यानंतर अवघ्या आठ दिवसांनी आरोपपत्र दाखल केले होते. त्यानंतर १९ नोव्हेंबरला न्यायालयात सुनावणी सुरू झाली होती. याप्रकरणी जवळपास दोन आठवडे सुनावणी झाली. मंगळवारी न्यायालयाने आपला निकाल जाहीर केला. या निकालात न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत फाशीची शिक्षा सुनावली, तसेच पीडित कुटुंबाला २० लाख रुपयांची भरपाई देण्याचे देखील आदेश न्यायालयाने दिले.
या निकालावर सूरतच्या नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. विशेष म्हणजे घटना घडल्यानंतर आरोपीला तातडीने फाशीची शिक्षा सुनावण्याची गुजरातमधील ही पहिलीच वेळ नाही. गुजरातमध्ये याआधी दोन प्रकरणांमध्ये पोलीस आणि प्रशासनाने महिनाभरात आरोपीला शिक्षा सुनावली आहे. महिनाभरात शिक्षा सुनावल्याची ही तिसरी घटना घडली आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …