गल्लीत क्रिकेट जिंकणाऱ्यांची वर्ल्ड कप जिंकण्याची भाषा – मलिकांचा भाजपला टोला

 

मुंबई – सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक भाजपने जिंकली. महाविकास आघाडीला हा मोठा धक्का मानला जात आहे. भाजपच्या याच विजयाबद्दल बोलताना नवाब मलिक यांनी नववर्षाच्या सुरुवातीला चांगलीच टोलेबाजी केली. गल्लीत क्रिकेट जिंकणारे वर्ल्ड कप जिंकू, असे म्हणत आहेत, असा टोला मलिक यांनी नारायण राणे तसेच भाजपला लगावला. तसेच विरोधकांनी केलेल्या आरोपांना तेवढ्याच क्षमतेने तोंड देणारे अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी विरोधकांवर घणाघाती टीका केली असून, नव्या वर्षात अनेक घोटाळे समोर आणणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

यापूर्वी नवाब मलिक यांनी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर खंडणी, तसेच सरकारी नोकरी मिळवण्यासाठी खोटे कागदपत्र दिल्याचा गंभीर आरोप केला होता, तसेच क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात शाहरूख खानच्या मुलाला गोवण्यात आले आहे, यामागे भाजपचा हात असल्याचेही त्यांनी म्हटले होते. यावेळी बोलताना फर्जीवाड्याचा माझा लढा सुरू राहील. हा माझा नवीन वर्षाचा संकल्प आहे. १८ कोटींची डील ५० लाखांची वसुली याचा काय अहवाल आला आहे?, जनतेच्या पैशांवर अधिकारी लोक पैसे वाया घालवतात हे कधीपर्यंत चालणार आहे?, आम्ही कोर्टाची लढाई लढू. सत्य समोर येईल. भ्रष्ट अधिकाऱ्यांना शिक्षा होणारच आहे. शेवटपर्यंत माझा लढा सुरू राहील, असे मलिक म्हणाले. तसेच, पुढे बोलताना त्यांनी भाजपवर निशाणा साधला. काही लोक बँका बुडवत आहेत. भाजपमध्ये गेल्यावर ईडी गप्प का बसत आहे. मंदिर, तसेच मशिदीची जमीन हडप केली जात आहे. नवीन वर्षात नवे फर्जीवाडे समोर आणणार आहे. माझ्यावर कोणी कितीही अब्रुनुकसानीचा दावा करू द्या, मी थांबणार नाही. जे केले आहे, त्याचा हिशोब द्यावा लागेल. पक्ष बघून आम्ही फर्जीवाडा बाहेर काढत नाही. ज्यांनी चुकीचे काम केले ते समोर येईल. त्यांच्यावर कारवाई होणारच आहे. मंदिर, तसेच मशिदीची जमीन लुटणारे नेते आणि अधिकारी आहेत, असेदेखील ते म्हणाले.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …