गर्दीत जाणे टाळा; महापौरांचे मुंबईकरांना आवाहन

मुंबई – मुंबईत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळत असल्याने मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबईकरांना सावधानतेचा इशारा दिला आहे. बाजार असो की, लग्न स्वत:हून गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा, असे कळकळीचे आवाहन महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले आहे.
महापौर किशोरी पेडणेकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन हे आवाहन केले आहे. लग्न समारंभ झाले पाहिजे, पण ते नियमांत होऊ द्या. गर्दी होणार नाही, याची काळजी घ्या. मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थित असे सोहळे करा, तसेच स्वत:हून लग्नापासून ते बाजारापर्यंत गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा, असे आवाहन महापौर पेडणेकर यांनी केले.
इतर पक्षांनीही कार्यक्रम टाळावेत
शिवसेनेने स्वत: दोन मोठे कार्यक्रम रद्द केले आहेत. इतर पक्षांनीही गर्दी होणार असे कार्यक्रम होऊ देऊ नये, असे आवाहन त्यांनी केले, तसेच ओमिक्रॉनला घाबरू नका. लक्षण आढळल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या, असेही त्या म्हणाल्या.
सुपर स्प्रेडर होऊ नका
लॉकडाऊन असताच कामा नये. कारण आता सर्व सावरत आहे. पुन्हा लॉकडाऊन होऊ नये म्हणून सावध झाले पाहिजे. सुपर स्प्रेडर होऊ नका. मास्क लावा, वॉशेबल मास्क वापरला तरी चालेल. ती काळजी घेतली, तर लॉकडाऊन लागणार नाही. कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. २० हजारांचा आकडा येऊ देऊ नका. दुसरी लाट आपण थोपवून जिंकलो. आता ही लढाईही तुमच्या सहकार्याने जिंकायची आहे. आपण ही लढाई जिंकू शकतो. येत्या दोन ते तीन दिवसांत मुख्यमंत्री कोरोनासंदर्भात जनतेशी बोलतील, असे त्यांनी सांगितले. शाळा बंद करण्याचा निर्णय योग्यच असल्याचे सांगतानाच इयत्ता पहिली ते नववीचे वर्ग ऑनलाइन सुरू राहतील असे त्यांनी स्पष्ट केले.
…तर इमारतच सील होणार
कोरोना रोखण्यासाठी सोसायट्यांसाठी महापालिकेने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्याची माहितीही त्यांनी दिली. ज्या विंगमध्ये २० टक्के किंवा त्यापेक्षा कोविड बाधित रुग्ण आढळल्यास ती इमारत सील करण्यात येणार आहे. आतापर्यंत १० टक्केपेक्षा जास्त रुग्ण आढळल्यास इमारत सील करण्यात येत होती, असेही त्यांनी सांगितले.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …