ठळक बातम्या

खो-खो : पंचवीस वर्षांनंतर पुण्याला दुहेरी मुकुट * मुंबई उपनगर व ठाणे उपविजेते

प्रतीक वाईकर राजे संभाजी, तर प्रियांका इंगळे राणी अहिल्या पुरस्काराची मानकरी
सोलापूर – महाराष्ट्र खो-खो असोसिएशन व सोलापूर ॲमॅच्युअर खो-खो असोसिएशन यांच्या मान्यतेने ५७ वी पुरुष-महिला राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा वेळापूर (ता. माळशिरस), सोलापूर येथे संपन्न झाली. या स्पर्धेत तब्बल २५ वर्षांनंतर पुण्याने दुहेरी मुकुट मिळवला. यापूर्वी १९९५-९६ साली कुळगाव-ठाणे येथे झालेल्या ३४ व्या पुरुष-महिला राज्य अजिंक्यपद निवड चाचणी खो-खो स्पर्धेत पुण्याने दुहेरी मुकुट मिळवला होता.
या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडूसाठी असलेली राणी अहिल्या पुरस्काराची मानकरी प्रियांका इंगळे ठरली, तर पुरुष गटातील राजे संभाजी पुरस्काराचा मान प्रतीक वाईकर याने मिळविला. या स्पर्धेतील तृतीय स्थान महिला गटात उस्मानाबाद आणि पुरुष गटात सांगलीने संपादन केले.
महिलांच्या अंतिम सामन्यात गतविजेत्या पुण्याला ठाण्यावर १३-१२ असा ३.४० मिनिटे राखून विजय मिळविताना विशेष प्रयास करावे लागले नाहीत. प्रियांका इंगळे (२:००, १:४० मि. संरक्षण व ५ बळी), दिपाली राठोड (२:१०, १:०० मि. संरक्षण व २ बळी) व श्वेता वाघ (१:५०, १:५०) यांच्या शानदार खेळीमुळे पुण्याने मध्यंतरात ९-५ अशी आघाडी घेतली होती. ठाण्याच्या रेश्मा राठोड (१:५० मि. संरक्षण व ४ बळी), मृणाल कांबळे (४ बळी) व कविता घाणेकर (२:२० मि. संरक्षण) यांची खेळी अपुरी पडली.
पुरुषांच्या अंतिम सामन्यात पुण्याने गतविजेत्या मुंबई उपनगरला १७-१६ असे एका गुणाने नमविले. मध्यंतरापर्यंत ८-८ अशी बरोबरी झाल्यानंतर निर्णायक आक्रमणात मुंबई उपनगरचा गुण मिळविण्याचा तर पुणे संरक्षणात बचाव करण्याचा प्रयत्न करीत होता. शेवटच्या मिनिटात पुण्याने बचाव करीत बाजी मारली. पुण्याच्या मिलींद करपे (१:०० मि. संरक्षण व ५ गडी), प्रतीक वाईकर (१:४० मि. संरक्षण व ३ गडी) व सागर लेंग्रे (१:४० मि. संरक्षण व १ गडी) यांची अष्टपैलू खेळी संघाच्या विजयात महत्त्वपूर्ण ठरली. मुंबई उपनगरच्या अक्षय भोंगरे (१:१०, १:०० मि. संरक्षण व ५ गडी), अनिकेत पोरे (१:३०, १:०० मि. संरक्षण व २ गडी), ऋषिकेश मुरचावडे (१:३०, १:१० मि. संरक्षण व १ गडी) याची अष्टपैलू लढत अपुरी पडली.
तृतीय स्थानासाठी झालेल्या सामन्यात लघुत्तम आक्रमणाच्या डावात महिला गटात उस्मानाबादने रत्नागिरी वर २३ सेकंदांनी, तर पुरुष गटात सांगलीने ठाण्यावर ११ सेकंदांनी मात केली.
खो-खोचे आधारस्तंभ व महाराष्ट्र खो-खो संघटनेचे माजी अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचे आयोजन वेळापूर येथील अर्धनारी नटेश्वर क्रीडा मंडळाने केले होते. पारितोषिके आमदार शहाजीबापू पाटील, बबनराव शिंदे, दीपक साळुंखे-पाटील, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य उत्तमराव जानकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. यावेळी भारतीय खो-खो महासंघाचे सहसचिव डॉ. चंद्रजीत जाधव, महाराष्ट्र खो-खो संघटनेचे सरचिटणीस गोविंद शर्मा, कार्याध्यक्ष सचिन गोडबोले, खजिनदार अरुण देशमुख, माजी सचिव जे. पी. शेळके आदी उपस्थित होते. स्पर्धा सचिव जावेद मुलाणी यांनी प्रास्ताविक केले, तर समाधान काळे यांनी सूत्रसंचालन केले.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …