ठळक बातम्या

खेलो इंडिया कबड्डी : महर्षी दयानंद महाविद्यालयाचे दुहेरी यश!

मुंबई – महर्षी दयानंद महाविद्यालयाने मुंबई शहर केंद्राच्या ‘खेलो इंडिया’ कबड्डी स्पर्धेत दुहेरी यश मिळविले. मुलांच्या गटात परळच्या महर्षी दयानंदने दादरच्या विजय क्लबला ४२-२७ असे, तर मुलींच्या गटात श्री स्वामी समर्थ क्रीडा मंडळाला ४७-२२ असे सहज नमवित ‘डबल धमाका’ केला. मुंबई शहर कबड्डी असो.च्या विद्यमाने मुंबई वडाळा येथील शारीरिक शिक्षण मंडळाच्या भव्य क्रीडांगणावर आयोजित केलेल्या या स्पर्धेत मुलांच्या विभागात ३२, तर मुलींच्या विभागात ०९ संघांनी आपला सहभाग नोंदविला होता. दोन दिवस सकाळ व सायंकाळ अशा दोन सत्रात सामने खेळविण्यात आले.

मुलांच्या अंतिम सामन्यात महर्षी दयानंदने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करीत झटपट गुण वसूल करण्याचा सपाटा लावत आपल्याकडे आघाडी घेतली होती. मध्यांतरालाच २४-१३ अशी ११ गुणांची भक्कम आघाडी घेत दयानंदने विजयाचा पाया रचला होता. उत्तरार्धात सावध खेळ करीत या विजयावर शिक्कामोर्तब केले. तुषार शिंदे, प्राणिल म्हात्रे यांच्या जोशपूर्ण चढाया आणि यश राक्षे यांच्या भक्कम पकडी महर्षी दयानंदच्या विजयात महत्त्वपूर्ण ठरल्या. यश लांबे, आयुष साळवी यांनी उत्तरार्धात चतुरस्त्र खेळ करीत सामन्यात रंगत आणण्याचा बऱ्यापैकी प्रयत्न केला, पण विजय क्लबला विजयी करण्यात तो खेळ फारच कमी पडला. मुलींच्या गटात महर्षी दयानंद महाविद्यालयाने लालबागच्या श्री स्वामी समर्थ क्रीडा मंडळाला सहज पराभूत करीत हे जेतेपद आपल्या नावे केले. सुरुवातीपासूनच धडाकेबाज खेळ करीत दयानंदने या सामन्यावर आपले वर्चस्व राखले. पूर्वार्धातच २२-०९ अशी मोठी आघाडी घेत महर्षी दयानंदने विजेतेपदाची दावेदारी पक्की केली. उत्तरार्धात देखील त्याच खेळाची पुनरावृत्ती करीत या दावेदारीवर विजयाची मोहर उमठविली. हरजितकौर सिद्धूचा अष्टपैलू खेळ त्याला मानसी पाटीलची मिळालेली चढाईची,तर प्राची भादवणकर व रिद्धी हडकर यांची मिळालेली पकडीची साथ यामुळे महर्षी दयानंदने हा विजय साकारला. ऋतू परब, मानसी पवार, सई शिंदे यांनी जोरदार प्रतिकार करीत सामन्याची रंगत वाढविण्याचा प्रयत्न केला. पण संघाला विजयी करण्यात त्यांचा खेळ कमी पडला.
या अगोदर झालेल्या मुलांच्या उपांत्य सामन्यात महर्षी दयानंद महाविद्यालयाने विजय बजरंग व्यायामशाळेचा ५६-१६ असा, तर विजय क्लबने अमर संदेश क्रीडा मंडळाचा ५९-२५ असा पराभव करीत अंतिम फेरीत धडक दिली होती. मुलींच्या उपांत्य सामन्यात महर्षी दयानंद विद्यालयाने सुकाईदेवी स्पोर्ट्स क्लबचा ४७-१७ असा, तर श्री स्वामी समर्थ क्रीडा मंडळाने जिजामाता महिला संघाचा ५६-१५ असा पाडाव करीत अंतिम फेरी गाठली होती. या स्पर्धेत विजयी झालेले दोन्ही संघ व प्रत्येक गटात निवडलेले ५-५ मुले व मुली झोनल स्पर्धा खेळण्यासाठी ठाण्याला रवाना होतील. या ठिकाणी मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड व पालघर येथील विजयी संघ सहभागी होतील.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …

2 comments