खुर्ची मागचा अर्थ

शिवसेना खासदार संजय राऊत सध्या एका नव्याच चर्चेत आहेत. यूपीए मजबूत करण्याचे त्यांचे चाललेले प्रयत्न, काँग्रेसबरोबर ते स्थापित करत असलेले संबंध, भाजप विरोधी एकजूट करताना काँग्रेसला न वगळता आघाडी करण्याचे त्यांचे प्रयत्न भाजपच्या समर्थकांना आणि भाजपला चांगलेच झोंबत आहेत. त्यामुळे संजय राऊतांना लक्ष्य करण्याचे काम आता सुरू असल्याचे दिसते आहे, पण काही झाले तरी आपल्या भूमिकेपासून संजय राऊत तसूभरही हालणार नाहीत.
गुरुवारी ते असेच चर्चेत आले ते खुर्ची प्रकरणावरून. सध्या ते दिल्लीत असून, ते अनेकांच्या गाठीभेटी घेत आहेत. दुसरीकडे संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू असून, १२ खासदारांचे निलंबन करण्यात आल्याने विरोधकांकडून संसदेबाहेर निदर्शने केली जात आहेत. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तिथे हजेरी लावली होती. यावेळी शरद पवारांसाठी संजय राऊत खुर्ची आणत असल्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोवरून विरोधक टोला लगावत असताना संजय राऊत यांनी त्यांना उत्तर दिले आहे, मात्र उत्तर देताना त्यांची चिभ घसरली आणि त्यांनी आक्षेपार्ह उल्लेख केला. अर्थात ते फार महत्त्वाचे नाही. आता ज्येष्ठ नेत्यांना खुर्ची दिली म्हणून त्यात बिघडले कुठे?, पण सोशल मीडियाला एक निमित्त मिळाले. आता काँग्रेसबरोबर जुळवून घ्यायचे म्हणजे अशा तडजोडी या कराव्या लागणारच ना?, आपल्या भावी मित्र पक्षासाठी त्याच्या तत्वानुसार वागण्याचे धोरण ते आखत असतील, तर त्यात गैर काय आहे?, ती काँग्रेसची संस्कृती आहे. मागे राहुल गांधी मुंबईत आले होते, तेव्हा काँग्रेसच्या एका आमदाराने राहुल गांधींच्या चपला उचलून घेतल्या होत्या. साहजीकच काँग्रेसबरोबर जायचे असेल, तर अशा प्रकारचे जोडे उचलणे, खुर्चा उचलणे या कामाची सवय केली पाहिजे हा फार मोठा संदेश त्यांनी दिला आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधकांचा जळफळाट झालेला दिसतो.

आता संजय राऊत यांना पवारांसाठी खुर्ची घेऊन जात असल्याच्या व्हायरल फोटोवरून भाजप नेते टीका करत असल्यासंबंधी विचारण्यात आले असता ते म्हणाले की, लालकृष्ण अडवाणी जरी तिकडे असते, तर मी त्यांनाही खुर्ची दिली असती. शरद पवारांची प्रकृती, त्यांचे वय, त्यांना होणारा त्रास हे पाहता यात गैर काय आहे?, ते आंदोलनात माझ्यासोबत आले होते. त्यांना चालतानाही त्रास होत होता. त्यांना मांडी घालून बसता येत नाही. त्यांच्या पायाला त्रास आहे. अशावेळी महाराष्ट्रातील एका पितृतुल्य, वडिलधाºया व्यक्तीला मी स्वत: खुर्ची आणून दिली हे जर कोणाला आवडले नसेल, तर ही महाराष्ट्राची संस्कृती नसून नवी विकृती आहे. अशी त्यांनी स्पष्टपणे प्रतिक्रिया दिली ती अत्यंत मोलाची आहे. ज्येष्ठाचा आणि श्रेष्ठांचा आदर हा केलाच पाहिजे, पण त्याचे भान न ठेवता फक्त टीका करत बसायचे हे काही ठीक नाही.
शिवसेना भाजप बरोबर होती, तेव्हा ती हिंदुत्ववादी होती. आता काँग्रेसबरोबर जाण्याचे निश्चित झाल्यावर त्यांना ही पत्थ्य पाळावीच लागतील. निवडणुकीच्या निमित्ताने इथून पुढे काँग्रेसचे अनेक नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी येतील त्यांच्या पुढेपुढे हे करावेच लागणार आहे. आघाडीचा धर्म पाळण्यासाठी मोठ्या भावाला मान देण्याची भूमिका जर संजय राऊत यांनी घेतली असेल, तर त्यात गैर काय?, सत्तेतील भाजपची खुर्ची काढून घ्यायची असेल, तर शरद पवारांना खुर्ची देण्याची त्यांची भूमिका बरेच काही सांगून जाते. या कृतीमागचा नेमका अर्थ समजून घेतला पाहिजे.

यूपीए संपुष्टात आली, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या. दुसरीकडे यूपीएचे किंवा भाजप विरोधी नव्या आघाडीचे नेतृत्व शरद पवारांकडे असावे असे अनेकांना वाटते, पण त्याचवेळी काँग्रेसला वगळून अशी कोणतीही आघाडी योग्य नाही हे संजय राऊत ठासून सांगत आहेत. अशावेळी एकीकडे काँग्रेसशी संधान साधत असताना दुसरीकडे पवारांना खूर्ची द्या असा त्यांचा संदेश म्हणजे यूपीए आघाडीचे नेतृत्व शरद पवारांकडे देण्याची गरज आहे, असेच त्यांना सुचवायचे आहे. भले शरद पवार पंतप्रधानपदाचे उमेदवार नसतील पण यूपीएचे निमंत्रक, अध्यक्ष म्हणून त्यांना मान देण्यास काही हरकत नाही, अशी शिष्ठाई संजय राऊत आपल्या कृतीतून करत आहेत. काँग्रेस हा मोठा पक्ष असल्याने पंतप्रधानपदासाठी दावा त्यांचा असणार आहे. त्यामुळे जर ही आघाडी यशस्वी झाली, तर पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून राहुल गांधींचे नाव पुढे करता येईल, पण यूपीएचे अध्यक्ष म्हणून शरद पवारांना खुर्ची देण्यास काहीच हरकत नाही हे संजय राऊत सर्व विरोधकांपुढे सुचवत आहेत हे लक्षात घेतले पाहिजे.
शरद पवार जर या अध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसले, तर यूपीएला ते चांगल्याप्रकारे यश मिळवून देतील याचा संजय राऊत यांना विश्वास वाटतो. इतकेच काय विरोधकांनाही ते लक्षात आले असावे म्हणूनच कदाचित संजय राऊत यांना ट्रोल केले जात असावे. पण आता यूपीएला पुढे आणण्यासाठी शिवसेनेला अशाच खुर्च्या, चपला उचलायला लागल्या तरी हरकत नाही, पण मागे हटणार नाही हे दाखवण्यात ते यशस्वी झाले हे नक्की.

– प्रफुल्ल फडके/बिटवीन द लाईन्स
9152448055\\

About Editor

अवश्य वाचा

आसामी दणका

 गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी यांना बुधवारी रात्री उशिरा आसाम पोलिसांनी गुजरातमधील पालनपूर येथील सर्किट हाऊसमधून …