उस्मानाबाद – अधिकार आले की, अधिकारी उन्मत्त होतात. राजे असल्यासारखे वागतात. आपण दीनदुबळ्या, गरिबांसाठी काम करणारे कर्मचारी आहोत, हेच विसरतात. अशाच एका स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्याची खासदार ओमराजे निंबाळकर यांनी उस्मानाबादमध्ये चांगलीच खरडपट्टी काढल्याची घटना घडली. हा अधिकारी पीक कर्जासोबत शेतकऱ्यांना तब्बल १० हजारांचा विमा बंधनकारक करत होता. तो अधिकारी शेतकऱ्यांकडून अधिकचे पैसे उकळत असल्याचा आरोप त्याच्यावर आहे. जे शेतकरी हे पैसे देत नसत, त्यांना अपमानास्पद वागणूक दिली जायची. या अधिकाऱ्याला खासदारांनी चांगले फैलावर घेतले.
खा. ओमराजे निंबाळकर शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर एसबीआय अधिकाऱ्याला जाब विचारायला गेले, तेव्हा त्या अधिकाऱ्याच्या दालनातही शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांसमोर आपल्या तक्रारींचा पाढा वाचला. हे अधिकारी कसे दालनाबाहेर काढतात, हे सांगितले. हे सारे खोटे असेल, तर सीसीटीव्ही फुटेज काढून पाहा, अशी मागणी त्यांनी केली. शेतकऱ्यांना दिलेली वागणूक ऐकताच खासदार निंबाळकर यांचा पारा चढला. त्यांनी अधिकाऱ्याला शेतकऱ्यांसमोरच फैलावर घेतले. ते म्हणाले, तुम्ही काय भाषेत बोलता, तुम्हाला शोभले पाहिजे साहेब. तुम्ही इतके वयस्क आहात, तुमच्या वयाचा तरी तुम्ही आब राखा. तुम्ही मॅनेजर आहात. या भाषेत बोलता लोकांना. तोंडावर कागदे मारता, असा सवाल केला, तेव्हा अधिकाऱ्याचा चेहऱ्या पाहण्यासारखा झाला होता. निंबाळकर पुढे म्हणाले, तुम्ही तुमच्या घरचे जहागीरदार आहात. त्या बिचाऱ्यांनी काय करावे. त्या बिचाऱ्यांना कर्जाची गरज आहे, म्हणून आलेत तुमच्याकडे. तुम्ही त्यांचे १० हजार कशाला काढायला लागले. तुम्ही अर्ज घेतला का, किती लोकांचा विमा काढला. तुम्हाला असा १० हजारांचा विमा काढण्याचा अधिकार कोणी दिला, असा सवाल त्यांनी केला. यावेळी शेतकऱ्यांनी आम्ही दोन किंवा चार हजारांचा विमा काढण्याची मागणी केल्याचेही सांगितले. मात्र, अधिकाऱ्यांनी ही स्कीमच तशी असल्याची सावरासावर केली. हे ऐकूण खासदारांच्या रागाचा पारा चढला. त्यांनी पुन्हा या अधिकाऱ्याला झापून काढले.
One comment
Pingback: Limitado ang Exness