खासदारांचे निलंबन मागे घेतले नाही तर… विरोधक आक्रमक

नवी दिल्ली – कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या ५ पक्षांच्या १२ खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. त्यामुळे विरोधी पक्ष आक्रमक झाला असून, या विरोधकांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. खासदारांचे निलंबन मागे घेतले नाही, तर आम्ही अधिवेशनावर बहिष्कार टाकू, असा आक्रमक पवित्रा विरोधकांनी घेतला आहे.

राज्यसभेतील १२ सदस्यांना सोमवारी निलंबित करण्यात आले होते. त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी काँग्रेसच्या नेतृत्वात विरोधी पक्षाची बैठक पार पडली. या बैठकीत खासदारांचे निलंबनावर चर्चा करण्यात आली. निलंबन मागे घेतले नाही, तर अधिवेशनावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे, तसेच याप्रकरणी निलंबित खासदारांनी माफी मागण्याचा प्रश्नच येत नसल्याचेही विरोधकांनी म्हटले आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात कृषी कायद्यांवरून प्रचंड गोंधळ झाला होता. १२ ऑगस्ट रोजी संसदेत हायव्हेल्टेज ड्रामा पाहायला मिळाला होता. विरोधी पक्षाचे खासदार वेलमध्ये उतरले होते. या खासदारांनी प्रचंड गोंधळ घातल्याने त्यांना आवरण्यासाठी पहिल्यांदाच संसदेत मार्शलला बोलावण्यात आले होते. सभागृहात कागद भिरकावणे, फाडणे आणि टीव्ही स्क्रिन तोडण्याचा या खासदारांवर आरोप आहे. या प्रकरणावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी एकमेकांवर आरोप केले होते. निलंबित करण्यात आलेल्या खासदारांमध्ये काँग्रेस, टीएमसी, सीपीआय आणि शिवसेनेच्या खासदारांचा समावेश होता. गोंधळ केल्याचा ठपका ठेवत काँग्रेसच्या ६ खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे, तर त्यात शिवसेनच्या २ खासदारांवरही निलंबनाची कारवाई करण्यात आली. यात पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या काही खासदारांचाही समावेश आहे. निलंबनाची कारवाई झालेल्या या १२ खासदारांना हिवाळी अधिवेशनात उपस्थित राहता येणार नाही. त्यामुळे या खासदारांच्या अडचणी वाढल्या आहेत.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …