नॅशनल क्राइमच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या अहवालात गेल्यावर्षी सर्वाधिक आत्महत्या या छोट्या व्यावसायिकांनी केल्याचे स्पष्ट झाले आहे. कोरोनामुळे निर्माण झालेली आर्थिक तंगी आणि विस्कटलेले अर्थचक्र यामुळे हे घडल्याचे समोर आले होते. आता या परिस्थितीतून आपण बाहेर पडत असताना आणि पुढच्या लाटेला सामोरे जाताना दिवाळी निमित्ताने सढळ हाताने खरेदी करण्याचे व्रत प्रत्येकाने घेतले, तर या अर्थचक्राला गती देण्याचे काम आपण करू शकतो.
कोरोना आणि त्यामुळे पुकारलेल्या लॉकडाऊनने आपल्या अर्थव्यवस्थेवर मोठा आघात केला होता. गेल्यावर्षी मार्च महिन्यापासून सप्टेंबरपर्यंत याचा फार मोठा फटका बसला होता. त्यानंतर यावर्षी एप्रिल ते सप्टेंबरपर्यंत असाच फटका बसला होता. यामध्ये अनेकांचे रोजगार गेले. नोकरी व्यवसाय धोक्यात आले. धंदा बुडाला. व्यवसाय नष्ट झाले. स्वयंरोजगाराला कुलूप लागले. यंत्रांची आणि वाहनांची चाकं थांबली. उत्पादन आणि निर्मिती थांबली. त्यामुळे बाजार, विक्री, क्रयशक्ती सारेच खंडीत झाले. चलन जणू जागेवर थांबले. अर्थचक्राला ब्रेक लागला, परंतु आता दिवाळीच्या निमित्ताने हे थांबलेले चक्र बºयापैकी सुरू झालेले दिसत आहे. त्याचा फायदा सर्वांना होईल, अशी अपेक्षा. कोरोनाने निर्माण केलेला हा अंधकार दिवाळीतील उलाढालीने उजळून निघेल, अशी अपेक्षा आहे. प्रत्येकाने सढळ हस्ते खरेदी केल्याने अर्थव्यवस्था गतीमान होईल आणि पुन:पुन्हा पैसा तुमच्याकडे येईल, हे लक्षात घेतले पाहिजे.
त्यामुळे गेल्यावर्षीच्या चैत्री पाडव्यापासून बंद झालेली ही अर्थव्यवस्था आता दिवाळीतील पाडव्यापासून तरी सुरळीत सुरू होईल, अशी अपेक्षा आहे. किंबहुना तसा विश्वास वाटू लागल्याने बाजारपेठेतही थोडाफार उत्साह दिसत आहे. अर्थात खरेदी झाली पाहिजे; पण उत्साहाच्या भरात गाफील राहून चालणार नाही. नाही तर पुन्हा तिसºया लाटेची भीती आहे. यासाठी आर्थिक उलाढाल कितीही केली, तरी ही अर्थव्यवस्था सुरळीत चालण्यासाठी सुरक्षेला प्राधान्य दिले, तर ही दिवाळी हा अंधकार दूर करण्यास कारणीभूत होईल हे नक्की.
अनलॉकनंतर अनेक व्यवहार आणि कामकाज एकामागून एक सुरू करण्यात आले आहेत. दळणवळण सुरू झाले आहे. लोकांनी आपली नोकरी, धंदा, उद्योग, व्यवसाय आणि कामकाज पुन्हा सुरू केले आहे. अनलॉकमध्ये पोटापाण्यासाठी, कुटुंबासाठी जो तो पुन्हा मेहनत करू इच्छित होता, कारण जीवन अनिश्चित काळासाठी थांबू शकत नाही. कामकाजामुळे बाजारात चलन पुन्हा फिरायला सुरुवात झाली आहे. गरजा आहेत आणि त्या भागवण्यासाठी बाजार आहे. खिशात पैसा म्हणजे क्रयशक्ती आहे. मागणी, पुरवठा आणि खरेदी विक्री आहे. ही गती आता एकदम वाढलेली दिसत आहे. दिवाळीच्या निमित्ताने वेगाने फिरणारे हे अर्थचक्र एक चांगली बाब आहे. त्यामुळे गेल्या सहा महिन्यांत आलेली मरगळ निघून जाईल, अशी अपेक्षा आहे.
दिवाळी हा सण आपल्या देशाच्या कानाकोपºयात सर्व जाती-धर्मियांकडून, गोरगरीब ते श्रीमंत अशा प्रत्येकाकडून आपापल्या परिने उत्साहात साजरा केला जातो. दसरा ते दिवाळी या कालावधीत लाखो कोटींची उलाढाल होत असते.
त्यामुळे कोरोनाने अस्थिर झालेली बाजारपेठ, डळमळीत झालेली खरेदी-विक्री व्यवस्था, तेजी मंदी, नफा आणि लाभ हे सर्व आता गतीमान होईल आणि सर्वसामान्यांच्या आयुष्यात आलेला हा महामारीचा अंधकार दूर होईल, ही अपेक्षा आहे.
एकूणच सर्वांनाच सावरण्यासाठी दिवाळी हा सण ही एक मोठी संधी आहे. अनेक व्यवहार आता नियमीत सुरू होत आहेत, ही देशाच्या अर्थचक्रासाठी हे शुभ बदलाचे संकेत आहेत. खरं तर कोरोनाची भीती फक्त संसर्गाची नव्हती. जर कोरोना आणि लॉकडाऊन संपलेच नाही, तर पुढे काय? नोकरी, धंदा, रोजगार संपला. उत्पन्नाचे मार्ग खुंटले. पैसा येणे बंद झाले आणि क्रयशक्ती रोडावली. यामुळे लॉकडाऊन काळात आणि नंतरही लोकांनी जमेल तशी आणि जमेल तितकी बचत करण्याच्या मार्ग पत्करला आहे, त्यात भागवले आहे. त्यामुळे सामान्यांची बचत झाली, काटकसर झाली असली, तरी बचतीच्या विरोधाभासाचा जो सिद्धांत आहे, त्याचे प्रत्यंतर प्रत्येकाला आले. देशाची अर्थव्यवस्था कोलमडल्याचे त्यामुळे दिसून आले. आता सगळीकडे पुरेशी काळजी घेऊन भारतीयांचे कामकाज पूर्वीप्रमाणे सुरू झाले आहे.
बचतीतील काही भाग आणि बोनस मिळून होणारी रक्कम दिवाळीच्या सणाला बाजारात खर्च झाली, तर अर्थचक्राला अधिक गती प्राप्त होणार आहे. तसे बघायला गेले, तर दसºयापासून बाजारात तेजी आहे. सदनिका, प्लॉट, बंगला यांची खरेदी वाढली आहे. सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंना वाढती मागणी आहे. दुचाकी, चारचाकी आणि इतर वाहनांची विक्री जोमाने झाली आहे. हे सारे उत्साहवर्धक आहे. कोरोना आणि लॉकडाऊनने थांबवलेल्या अर्थचक्राला गती प्राप्त होत आहे आणि त्याला वेग देण्याची संधी दिवाळीच्या खरेदी रूपाने पुढ्यात आलेली आहे. बाजाराचे चक्र खरेदी आणि विक्रीवर म्हणजेच ग्राहकांच्या खर्च करण्याच्या क्षमतेवर चालते. ही क्षमता बाजारात पैसा आणणार आहे. दिवाळीचा हा थोडा अधिकचा खर्च अर्थव्यवस्थेला उभारी, चालना, प्रोत्साहन देणारा ठरणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने सढळ हस्ते खरेदी करणे हेही देशकार्यच म्हणावे लागेल.
प्रफुल्ल फडके/बिटवीन द लाईन्स\\
One comment
Pingback: โรงแรมสุนัขเข้าได้