नवी दिल्ली – ज्या भारतीयांनी कोव्हॅक्सिन लसीचे डोस घेतले आहेत, त्यांना आता कोव्हिशिल्ड लस घेण्याची परवानगी द्यावी, अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. कोव्हॅक्सिनला जागतिक आरोग्य संघटनेकडून आपत्कालीन वापरासाठी परवानगी मिळण्याच्या प्रक्रियेला उशीर होत असल्याच्या पार्श्वभूमीवर ही याचिका दाखल करण्यात आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मान्यतेअभावी कोव्हॅक्सिन लस घेतलेल्या नागरिकांना देशाबाहेर जाताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून त्यामुळे त्यांना कोव्हिशिल्ड लस घेण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे.
नागरिकांनी कुठली लस घ्यावी किंवा एका लसीवर दुसरी लस घेतलेली चालेल का, हा वैद्यकीय प्रश्न असून तो कोट्यवधी नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालय काही निर्णय घेऊ शकणार नाही, असे वाटत असल्याचे न्या. धनंजय चंद्रचूड यांनी म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयात या याचिकेवर सुनावणी मात्र होणार असून दिवाळीनंतर सुनावणीची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. कोव्हॅक्सिन घेतलेल्या नागरिकांना कोव्हिशिल्ड घेण्यासाठी परवानगी मागणाऱ्या याचिकाकर्त्यांना प्रतीक्षा करण्याचा सल्ला न्यायालयाने दिला आहे. जागतिक आरोग्य संघटनेसोबत भारत बायोटेकच्या अधिकाऱ्यांच्या बैठका सुरू आहेत. लवकरच भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीला मान्यता मिळण्याची शक्यता आहे. तोपर्यंत संयम ठेवण्याचा सल्लाही न्यायालयाने याचिकाकर्त्यांना दिला आहे.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …