कोविड काळात महापौर-स्थायी समितीच्या अध्यक्षांकडून कोटींची लूट – किरीट सोमय्यांचा आरोप

मुंबई – महापालिकेत सत्तेत असलेल्या शिवसेनेने कोविड काळात शेकडो कोटींची लूट आणि कमाई केल्याचा गंभीर आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे. घोटाळेबाज शिवसेनेसाठी मुंबई महापालिका म्हणजे लुटण्याचे साधन आहे. यामध्ये महापौर असोत, स्थायी समिती अध्यक्ष असोत किंवा पक्षाचे दिग्गज नेते असोत सर्वांचाच सहभाग आहे. कोविडमध्ये यांनी महापालिकेची शेकडो कोटींची लूट केली आणि स्वत:ची कमाई केली, असा आरोप पत्रकार परिषद घेऊन सोमय्या यांनी केला आहे.
मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष आणि शिवसेना नेते यशवंत जाधव व त्यांची पत्नी आमदार यामिनी यशवंत जाधव यांनी पैसे लुटले आहेत. हे पैसे लुटायचे आणि कसे पास करायचे यासाठी पवार-ठाकरे यांनी मंत्रालयात स्पेशल कार्यशाळा आयोजित केल्याचे दिसतेय. त्यामुळेच अनिल देशमुख, अनिल परब, भावना गवळी आणि आता यशवंत जाधव हे सगळेच अडकलेले दिसतायत. यशवंत जाधवांनी १५ कोटी रुपये उदय शंकर महावार आणि पीयूष जैन या एजंटला दिले. यातील महावार हा कुप्रसिद्ध मनी लाँड्रिंग करणारा एजंट आहे. यशवंत जाधव यांनी प्रधान डिलर्स प्रा. लि. या बोगस कंपनीच्या खात्यात १५ कोटी रुपये ट्रान्सफर केले. या कंपनीचे एक रुपयाचे शेअर्स ॲपल कॉमर्स प्रा. लि., गुडबॉन मर्चंटाइल प्रा. लि., फुलवारी ट्रेडिंग प्रा. लि., स्वर्णभूमी वाणिज्य प्रा. लि., निश्चया ट्रेडिंग प्रा. लि., अष्टविनायक ट्रेडिंग प्रा. लि. या पाच कंपन्यांनी पाचशे रुपये दराने विकत घेतले. यामध्ये प्रधान डिलर्ससह त्याचे शेअर्स घेणाऱ्या पाच कंपन्यांही बोगस आहेत, असा दावा सोमय्या यांनी केला आहे.
दरम्यान, हे १५ कोटी रुपये प्रधान डिलर्सच्या खात्यातून यशवंत जाधव यांच्या खात्यात जमा झाले. यापैकी यशवंत जाधवांच्या खात्यात दोन कोटी रुपये, यामिनी जाधवांच्या खात्यात दोन कोटी, निखिल यशवंत जाधव यांच्या खात्यात ५० लाख, यतीन यशवंत जाधव यांच्या खात्यात ५० लाख, निखिल-यशवंत यांच्या कंपनीच्या खात्यात ३ कोटी रुपये, त्याच्या दुसऱ्या कंपनीत २ कोटी रुपये, त्यांच्या नातेवाईकांच्या कंपनीत ५ कोटी रुपये जमा झाले. यानंतर यशवंत जाधवांनी हे पैसे यूएईला पाठवले. उद्धव ठाकरेंना मानले पाहिजे, कारण हा नवीन प्रकार शिवसेनेत सुरू झाला आहे. माफिया कॉन्ट्रॅक्टरकडून पैसे घेत आहेत. यशवंत जाधवांनी १५ कोटी रुपये दिले हे तपासात सिद्ध होत असल्याचा दावाही यावेळी सोमय्या यांनी केला.
महापौर पेडणेकरांचा कोविड घोटाळ्यात सहभाग
स्थायी समिती अध्यक्षांबरोबरच महापौर किशोरी पेडणेकर यांनीदेखील घोटाळा केल्याचा दावा यावेळी सोमय्या यांनी केला. डिपार्टमेंट ऑफ कंपनी एफएसमध्ये पेडणेकर यांनी डॉक्युमेंट फाइल केले आहेत. यामध्ये पेडणेकर यांच्या मालकीच्या एका कंपनीने मंत्री आदित्य ठाकरे यांच्या अखत्यारितील कोविड सेंटर चालवण्याचे कॉन्ट्रॅक्ट एका कंपनीला दिले. जी कंपनी स्वत: पेडणेकर यांचीच आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …