कोरोना काळातील खर्चामध्ये हजारो कोटींचा भ्रष्टाचार – भाजप

मुंबई – पालिकेचे कोरोनावर हजारो कोटी खर्च झाले आहेत. पालिकेतील सत्ताधाऱ्यांनी कोरोना काळात आपले गोदाम भ्रष्टाचार करून भरले असल्याचा आरोप करत भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी स्थायी समितीत मुलुंड येथील रिचर्डसन अँड क्रुडास जम्बो कोविड सेंटरच्या खर्चावरून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले. या प्रस्तावात नियमांची पायमल्ली झाली असून, हा प्रस्ताव फेरविचारार्थ परत पाठवावा, अशी मागणी शिंदे यांनी केली आहे.
कोरोना काळात केलेल्या खर्चाला मंजुरी देताना स्थायी समिती सदस्यांना कुठलीही माहिती दिली जात नाही. ही बाब अतिशय गंभीर असून, कायद्याची पायमल्ली करणारी आहे. मुलुंड येथील कोविड सेंटरची जागा सिडकोची असून, भाड्यापोटी १० कोटी ९० लाख रुपये एवढी रक्कम देताना स्थायी समितीला त्याची माहिती देणे आवश्यक आहे. परिपत्रकानुसार सर्व खातेप्रमुख, सहाय्यक आयुक्त, उपायुक्त यांना आर्थिक बाबी अंतर्गत असलेले महसूलविषयक सर्व प्रस्ताव प्रमुख वित्त लेखापाल यांच्यामार्फत प्रस्ताव सादर करावेत, अशा सूचना असतानाही त्याचे उल्लंघन केले जात आहे. कोरोना काळातील प्रस्ताव लेखा विभागाच्या पडताळणीशिवाय समितीत आणले जातात. याचाच अर्थ कोरोना खर्चाच्या हिशेबात लपवाछपवी होत असून, याला कोणाचा राजाश्रय आहे?, असा सवाल शिंदे यांनी उपस्थित केला.

महापालिकेच्या अर्थसंकल्पाची परिस्थिती पाहता कोरोना काळातील खर्च हा मुंबईकर करदात्यांच्या पैशांची उधळपट्टी आहे. स्थायी समिती सदस्यांनी शहरातील सर्व जम्बो कोविड सेंटरला भेट देऊन वस्तुस्थिती पाहणे गरजेचे असल्याचे मत गटनेते शिंदे यांनी व्यक्त केले. मुलुंड येथील कोविड सेंटरला भाड्यापोटी ११ कोटी देताना नेमक्या काय उपाययोजना केल्या?, नेमके भाडे किती?, याआधी सिडकोने किती भाडे दिले?, किती दिवसांसाठी भाडे द्यावे लागणार, असे प्रश्न भाजपचे सदस्य भालचंद्र शिरसाट यांनी उपस्थित केला. तब्बल एक वर्षानंतर हा प्रस्ताव सादर होत असून, यात कुठल्याही खर्चाचा तपशील नसल्याची टीका शिरसाट यांनी केली.

 

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …