नवी दिल्ली – आगामी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापताना पाहायला मिळत आहे. यापैकी उत्तर प्रदेशमधील निवडणुकांकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे. अशातच आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. एका कार्यक्रमात बोलताना एमआयएम पक्षाचे नेते आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली, तसेच राहुल गांधींना ओळखत नसल्याचे सांगत निशाणा साधला.
ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भेटीनंतर काँग्रेसविरहीत आघाडीचे सूतोवाच केले होते. त्यानंतर यासंदर्भात देशभरात चर्चा सुरू झाली असून, अनेक काँग्रेस नेत्यांनी ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेसवर पलटवार केल्याचे पाहायला मिळाले. यातच आता एका आयोजित कार्यक्रमात बोलताना ओवैसी यांनी राहुल गांधींना ओळखत नसल्याचे सांगत काँग्रेसवर हल्लाबोल केला. गेली काही वर्षे काँग्रेससोबत राहिल्याने एक गोष्ट सांगू इच्छितो की, आगामी दोन ते तीन वर्षांत काँग्रेस फुटेल, असा मोठा दावा ओवैसी यांनी यावेळी बोलताना केला, तसेच कोण आहेत राहुल गांधी?, मी ओळखत नाही. ते कोण आहेत हे तुम्हाला माहीत असेल, तर मला सांगा, असा खोचक टोलाही लगावला. आम्हाला प्रत्येक पक्षाची बी-टीम म्हणून ओळखले जाते. जर तुम्ही राहुल गांधींना येथे बोलावले, तर ते भाजपसारखीच भाषा बोलतील आणि तशीच भाषा अखिलेश यादवही बोलतील, असे ओवैसी म्हणाले.