केवढी ही घाई?

स्पर्धा आणि टीआरपीच्या नादात आपण कोणत्या थराला जात आहोत, याचे भान वृत्तवाहिन्यांना राहिलेले नाही. सगळ्यात प्रथम ही बातमी आम्हीच दाखवली या मोठेपणाच्या नादात चुकीच्या आणि मनस्ताप घडवणाºया बातम्या दिल्या जात आहेत. यातून वाहिन्यांची विश्वासार्हता संपुष्टात येत आहे. खरंतर वृत्तवाहिन्यांवर विश्वास ठेवावा, अशी वृत्त नसतातच. केवळ आक्रस्ताळेपणा आणि खळबळ उडवण्यासाठी चहाडखोरी करण्याचा प्रकार करून आपल्या सोयीचे वाक्य दाखवायचे असला चाहटळपणाच बºयाच वेळा असतो, पण याचा अतिरेक अक्षरश: बुधवारी झाला. राष्ट्रीय कुस्तीपटू निशा दहिया हिची हत्या झाली आणि ती आणि तिच्या भावाचा मृत्यू झाल्याची बातमी जवळपास तासभर विविध वाहिन्यांनी दाखवून खळबळ माजवली.

सर्वात प्रथम ही बातमी एनडीटीव्हीने दाखवली. मग आजतकने दाखवली. त्यांचे अनुकरण करत मराठी वाहिन्यांनी ती बातमी चालवली. यामध्ये एबीपी माझाने तर खूपच मन लावून ती बातमी दाखवली. एबीपी माझाचे क्रीडा वार्तांकन करणाºया विजय साळवी यांनी भरभरून बोलून तिला श्रद्धांजलीही वाहिली. पंतप्रधान मोदींनी सकाळीच तिचे कसे कौतुक केले होते याचे वर्णन केले. असाच प्रकार बहुतेक वाहिन्यांवर झाला, पण एकाही वाहिनीला सत्य काय आहे हे जाणून घ्यावेसे वाटले नाही.
संपूर्ण देशभरात या वृत्तवाहिन्यांनी खळबळ माजवल्यावर ती बातमी साक्षात निशा दहियाने पाहिली आणि आपण ठणठणीत आणि जिवंत आहोत. आपली हत्या झालेली नाही, असे ट्विट केले, तशी व्हिडीओ क्लीपही तिने व्हायरल केली, पण त्यानंतर ज्या ज्या वाहिन्यांनी हे वृत्त पसरवले होते. त्यापैकी एकाही वाहिनीने याबाबत दिलगिरी व्यक्त केलेली नाही. आपण सारासार चुकीचे वृत्त दिलेले असतानाही त्याबद्दल खंत कुणाला वाटली नाही, याचे आश्चर्य वाटते.

सोशल मीडियावर अफवा नेहमी पसरवल्या जातात. तिथे विश्वासार्हता नाही, पण वृत्तवाहिन्यांनी अशा अफवा का पसरवाव्यात?, कशाच्या आधारे या बातम्या दिल्या जातात?, याला शोध पत्रकारिता म्हणत नाहीत. चुकीची बातमी देणे ही अक्षम्य चूक असताना वृत्तवाहिन्यांवर ती सातत्याने दाखवली जात आहे. बºयाचवेळा या बातम्या छोटी छोटी वेब पोर्टल व्हायरल करतात. त्यामुळे ज्यांच्या संबंधात ही बातमी असते, त्यांना प्रचंड मनस्ताप होतो, पण या अफवा पसरवणारांना त्याची खंत वाटत नाही. ही घाई कशासाठी केली जाते?, पाच मिनिटे उशिरा बातमी दिली म्हणून काही झोळीत धोंडा पडत नाही. आक्रस्ताळेपणाने बातमी सांगून आणि दंगा करत, नौटंकी करत बातमी देणे हे सभ्यतेला धरून नाही. बातमीचा खरा दर्जा पाहायचा असेल, तर तो दूरदर्शनवर, मराठी सह्याद्री वाहिनीवर बघायला बरा वाटतो. अत्यंत विचारपूर्वक आणि सभ्य शब्दांत बातमी दिली जाते. कोणती बातमी दिली पाहिजे याचे भान असते. दूरदर्शनच्या बातम्या पाहिल्या, तर लक्षात येईल की अरे आपल्याला या बातम्या वृत्तवाहिन्या कधीच पोहोचवत नाहीत. कितीतरी चांगले उपक्रम, सरकारी निर्णय यांची छान माहिती दूरदर्शन देत असते, पण या वाहिन्या मात्र फक्त अफवांचे पिक माजवत असतात. त्यांना फक्त खळबळ हवी असते. प्रेक्षकांची करमणूक करायची असते. जो प्रकार काही दिवसांपूर्वी व्हॉट्सअ‍ॅपवरून होत होता, तोच प्रकार आता वाहिन्या करत असतील, तर ते दुर्दैव म्हणावे लागेल. व्हॉट्सअ‍ॅपवर चार वर्षांपूर्वी कादर खान, शक्ती कपूर, मराठी अभिनेता सचिन खेडेकर अशा कितीतरी जणांच्या निधनाच्या बातम्या पसरवल्या होत्या. अनेक राष्ट्रीय नेत्यांच्या निधनाच्या बातम्या पसरवल्या होत्या. आता तेच काम वृत्तवाहिन्या करत असतील, तर आपल्या हातात रिमोट आहे, त्या वाहिन्यांची विश्वासार्हता संपुष्टात आली हे लक्षात घेऊन फक्त दूरदर्शनच्याच बातम्या पाहाव्या लागतील.
वृत्तवाहिन्यांचा हा आक्रस्ताळेपणा आजचा नाही. वृत्तवाहिन्यांवरील बातम्यांमुळे अनेकवेळा दंगली घडल्याचे प्रकार झाले आहेत. पंधरा वर्षांपूर्वी सातारा जिल्ह्यातील प्रतापगडावरील अफझल खानाची कबर हटवण्याचे प्रयत्न काही संघटनांनी चालवले होते. सातारा जिल्हा प्रशासनाने त्याला पूर्णपणे संरक्षण दिले होते. कबर व्यवस्थित आहे, यासाठी सातारच्या तत्कालीन जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुखांनी राज्यातील पत्रकारांना बोलावले होते आणि त्यांच्यासाठी विशेष गाड्यांची सोय करून पत्रकार दौरा काढला होता. प्रतापगडावर जायला कोणालाही बंदी होती. त्या ठिकाणपर्यंत सर्वांना तिथे नेऊन दर्शन घडवले होते. फक्त कबरीच्या जवळ जाण्यास मनाई केली होती. त्यावेळी आजतकच्या बातमीदाराने जिल्हाधिकारी आणि पोलीस कोणालाही कबरी जवळ जाण्यास मनाई करत आहेत. याचा अर्थ ती कबर तोडली असावी, अशी बातमी दिली. आजतकवरून ती बातमी दाखवली गेली आणि पाचवडजवळ एवढी मोठी दंगल घडली की, त्यात अनेकजण जखमी झाले. कबर तोडायला जाणाºया आंदोलकांना पाचवडजवळच रोखले होते. वाईपासून पसरणीपर्यंत आणि सातारपासून मेढ्यापर्यंत चोख बंदोबस्त होता. कोणालाही प्रतापगडाच्या दिशेने जाण्यास बंदी असतानाही आंदोलकांनी कबर तोडली, असे वृत्त देऊन आजतकने पाचवडची दंगल घडवली होती. त्यात अनेक आंदोलकांना जखमी व्हावे लागले होते. खळबळ माजवण्यासाठी बातमी देण्याच्या नादाने आपण चुकीचे वागत आहोत याचे भान वाहिन्यांना राहिलेले नाही. आपण चुकीचे वृत्त देत आहोत, याची खंतही वाटत नाही हे अत्यंत वाईट आहे. टीआरपीसाठी चुकीची वृत्त दाखवून प्रेक्षक खेचायचे हे प्रकार अक्षरश: अघोरी असेच आहेत.

About Editor

अवश्य वाचा

आसामी दणका

 गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी यांना बुधवारी रात्री उशिरा आसाम पोलिसांनी गुजरातमधील पालनपूर येथील सर्किट हाऊसमधून …