- गरोदर असल्याचे सांगत करायची ब्लॅकमेल, पण…
मुंबई – कुर्ला परिसरातील २० वर्षीय तरुणीवर बलात्कार करून हत्या केल्याच्या प्रकरणाला आता वेगळी कलाटणी लागली आहे. गरोदर असल्याचे सांगून प्रियकराला ब्लॅकमेल करणाऱ्या गोवंडीतील तरुणीला गर्भाशयच नसल्यामुळे ती गरोदर होणे शक्य नसल्याचे निष्पन्न झाले आहे. विनोबा भावेनगर पोलिसांनी तिचा प्रियकर रेयान शेख आणि त्याचा मित्र फैसल शेख या दोघांनाही अटक केली असून, तपासात आता तिसऱ्या आरोपीचा सहभाग उघड झाला आहे. मुंबईतील कुर्ला पश्चिम येथील एचडीआयएल कम्पाऊंडमधील एका रिकाम्या इमारतीच्या छतावर गुरुवारी २३ वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळला होता.
एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मृत तरुणी आरोपी रेयानच्या घराजवळच राहत होती. २३ नोव्हेंबर रोजी मावशीच्या घरी जात असल्याचे सांगून रेयानसोबत घरातून निघून गेली होती. तरुणीची आई रेयानकडे घरकाम करायची. तेव्हाच पीडिता आणि रेयान या दोघांची मैत्री झाली. ते एक-दोन वर्षांपासून एकमेकांच्या प्रेमात होते. ते गुपचूप भेटत असत आणि त्यांच्या पालकांना त्यांच्या अफेअरबद्दल काहीच माहिती नव्हती, तसेच गेल्या काही महिन्यांपासून तरुणी रेयानला आपण गरोदर असल्याचे सांगत होती आणि त्याने तिच्याशी लग्न करावे, अशी गळ घालत असल्याचे पोलिसांनी सांगितले. आपल्या पालकांना या गर्भधारणेबद्दल कळले तर काय होईल, या विचारांनी चिडलेल्या आणि घाबरलेल्या रेयानने त्याच्या मित्रांकडे सल्ला मागितला. तिला धमकावण्याची आणि न ऐकल्यास जीवे ठार मारण्याचा सल्ला मित्रांनी दिला.
रेयानने त्याच्या मित्राकडून (ज्याला अजून अटक व्हायची आहे) एक सीमकार्ड घेतले, तिला फोन करून कुर्ल्याला सोबत येण्यास सांगितले. तिथे गेल्यावर तो तिला रिक्षाने एचडीआयएल कम्पाऊंडमध्ये घेऊन गेला. तिथे रेयानचा मित्र फैसलही थांबला आहे, याची तरुणीला कल्पना नव्हती. रेयान तिला १३ व्या मजल्यावरच्या टेरेसवर घेऊन गेला, नंतर लिफ्ट रूममध्ये गेला, तिथे त्याने तिच्यावर जबरदस्ती केली आणि तिची मान कापली, असेही पोलिसांनी सांगितले. त्यानंतर लपून बसलेला फैसल बाहेर आला आणि त्याने तरुणीच्या डोक्यावर हातोड्याने वार केले, पोलिसांनी सांगितले की, तिच्या शरीरावर जखमांच्या २६ खुणा होत्या. तरुणीची हत्या केल्यानंतर, त्यांनी सीमकार्ड त्यांच्या मित्राला परत केले आणि तिघांनी एक आठवडा लपून राहण्याचा निर्णय घेतला.