पिंपरी – पुण्यानंतर आता पिंपरी-चिंचवडमध्ये आर्यन खान क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणातील वादग्रस्त पंच किरण गोसावीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. सद्यस्थितीला पुणे पोलिसांच्या ताब्यात असलेल्या किरण गोसावीने २०१५ मध्ये परदेशात नोकरी लावण्याच्या बहाण्याने पैसे घेतल्याची तक्रार दाखल झाली आहे. विजयकुमार सिद्धलिंग कानडे (३३) या व्यक्तीने भोसरी पोलीस स्थानकात ही तक्रार दाखल केली. गोसावीने ब्रुनेई येथे हॉटेल मॅनेजमेंटमध्ये नोकरी लावण्याचे आमिष पीडित व्यक्तीला दिले होते. त्यासाठी विजयकुमार कानडे यांच्याकडून २ लाख २५ हजार इतकी रक्कम घेतल्याची माहिती त्यांनी तक्रारीत दिली आहे. ज्या-ज्या लोकांची फसवणूक झाली आहे, त्यांनी भोसरी पोलीस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन भोसरीचे पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांनी केले आहे.
यापूर्वीही गोसावीच्या विरोधात पुण्यातील चिन्मय देशमुख नावाच्या तरुणाने फसवणुकीची तक्रार दाखल केली होती. २०१८ मध्ये मलेशियात नोकरी लावण्याच्या बहाण्याने तब्बल तीन लाखांची फसवणूक चिन्मयची झालेली. त्यानंतर पालघर जिल्ह्यातील एडवण येथील दोन तरुणांची फसवणूक केल्याचे समोर आले. उत्कर्ष तरे आणि आदर्श तरे या दोन तरुणांकडून परदेशात नोकरी लावण्याच्या बहाण्याने दीड लाख रुपये घेतले होते. या फसवणूकप्रकरणी केळवे सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरण गोसावीने मलेशिया, सिंगापूर यांसारख्या ठिकाणी नोकरी देण्याच्या बहाण्याने अनेक तरुणांची फसवणूक केली आहे. यासाठी त्याने तरुणांना लाखो रुपयांना गंडा घातल्याच्या घटना उघड झाल्या आहेत.