ठळक बातम्या

काश्मीरमध्ये असताना तीनशे कोटींची लाच देऊ केली गेली होती

माजी राज्यपाल सत्यपाल मलिकांचा खळबळजनक दावा
नवी दिल्ली – जम्मू-काश्मीरमध्ये राज्यपाल म्हणून काम करीत असताना आपल्याला तीनशे कोटी रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न झाला होता, असा खळबळजनक दावा सत्यपाल मलिक यांनी केला आहे. सत्यपाल मलिक हे जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल आहेत, तर सध्या ते मेघालयमध्ये राज्यपाल आहेत. अंबानी आणि संघातल्या एका उच्चपदस्थ व्यक्तीच्या संदर्भात दोन फायली मंजूर करण्याच्या बदल्यात हा मोबदला मिळणार होता, असा त्यांचा दावा आहे. मात्र कायद्यात न बसणारे कुठलेही काम आपण करणार नाही, असे सांगत आपण ती ऑफर फेटाळल्याचे ते म्हणाले. त्यानंतर त्यांनी पुढे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही कौतुक केले.
पंतप्रधानांचे नाव घेऊन काही व्यक्ती हे काम करू पाहत होत्या. त्यामुळे पंतप्रधानांच्या कानावर सुद्धा आपण ही गोष्ट घातली आणि त्यानंतर पंतप्रधानांनी सुद्धा आपल्याला कायद्यानुसारच काम करायला सांगितले. कुठलाही भ्रष्टाचार खपवून घेऊ नका असे पंतप्रधान मोदींनी आपल्याला सांगितल्याचे मलिक म्हणाले. राजस्थानमधल्या एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हा दावा केला आहे. हे काम नेमके कुठल्या संदर्भातील होते, याचा उलगडा त्यांनी केला नसला तरी अनिल अंबानी यांच्या कंपनीचे हे काम असल्याचा दावा काही माध्यमातून केला गेला आहे.
सत्यपाल मलिक हे आपल्या बेधडक बोलण्याने सातत्याने चर्चेत असतात. याआधी राज्यपाल पदावर असताना त्यांनी शेतक ऱ्यांच्या आंदोलनाचे समर्थन केले होते. शेतकरी आंदोलन असेच चालू राहिले, तर आपण आपले पद सोडून शेतकऱ्यांसोबत उभे राहू असे मलिक म्हणाले होते. काश्मीरमधील भ्रष्टाचाराबाबतही त्यांनी थेट विधाने केली होती. देशातला सर्वात जास्त भ्रष्टाचार काश्मीरमध्ये असल्याचे त्यांनी म्हटले होते. इतर राज्यांमध्ये पाच टक्के कमिशन मागितले जाते, तर काश्मीरमध्ये थेट १५ टक्के कमिशन मागितले जाते, असा आरोप मलिक यांनी केला होता.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *