ठळक बातम्या

कालीचरण महाराज यांना अटक

छत्तीसगड पोलिसांची कारवाई
रायपूर – येथील धर्मसंसदेत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्ये आणि शिवराळ भाषा वापरणारे कालीचरण महाराज यांना अखेर अटक करण्यात आली आहे. छत्तीसगडमधील रायपूर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. कालीचरण महाराजांविरोधात तिक्रपरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दाखल गुन्ह्यानुसार पोलिसांनी कारवाई करीत मध्य प्रदेशमधील खजुराहोमधून कालीचरण महाराजांच्या मुसक्या आवळल्या.
कालीचरण महाराज यांनी मोहनदास करमचंद गांधी (महात्मा गांधी) यांना अक्षरश: शिव्यांची लाखोली वाहिली होती. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओत कालीचरण महाराजांनी गांधीजींना अपशब्द वापरल्यानंतर त्यांचा मारेकरी नथुराम गोडसेचे आभार मानले होते. त्याच्या कृ तीचे त्यांनी अभिनंदन केले होते. नुकतेच देशभरात विविध ठिकाणी धर्मसंसदेचे आयोजन करण्यात आले होते. छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये जी धर्मसंसद पार पडली, त्यात कालीचरण महाराजांनी गांधीजींबद्दल गरळ ओकली होती.
कालीचरण महाराजांविरोधात छत्तीसगड, महाराष्ट्रात गुन्हे दाखल करण्यात आले होते. मध्य प्रदेशमधील खजुराहो येथील बागेश्वरी धाम येथून गुरुवारी पहाटे चारच्या सुमारास त्यांना अटक करण्यात आली. काही दिवसांपूर्वी रायपूर येथे झालेल्या धर्मसंसदेत कालीचरण महाराज यांनी महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेचे गोडवे गायले होते. त्यांच्याविरोधात रायपूर, महाराष्ट्रातील अकोला आणि पुण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. मागील काही दिवसांपासून छत्तीसगड पोलिसांकडून कालीचरण महाराजांचा शोध सुरू होता. त्यासाठी महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातही छत्तीसगड पोलिसांनी शोध घेतला होता.
या कारवाईबाबत पोलिसांनी कमालीची गुप्तता बाळगली होती, असे सूत्रांनी सांगितले. छत्तीसगड पोलिसांनी कालीचरण महाराजांविरोधात कारवाई करताना मध्य प्रदेश पोलिसांना कोणतीही माहिती दिली नव्हती. कालीचरण महाराज पोलिसांना गुंगारा देण्यासाठी आपल्या वास्तव्याची ठिकाणे बदलत होते. अखेर खजुराहो जवळील बागेश्वरी धाम येथील एका घरातून त्यांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले.
कालीचरण महाराज अकोल्यातील (महाराष्ट्र) जुने शहर भागातील शिवाजीनगरमध्ये भावसार पंचबंगला भागात राहतात. अकोल्यातील तरुणाईमध्ये या महाराजांची मोठी क्रेझ आहे. त्यांचे मूळ नाव अभिजीत धनंजय सराग, असे आहे. लहानपणापासून त्यांचा अध्यात्माकडे ओढा होता. ते कालीमातेची आराधना करायचे. पुढे अभिजीतचा कालीपुत्र कालीचरण झाला. पुढे लोकांनी त्यांना ‘महाराज’ असे संबोधने सुरू केले.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …