‘कारणे दाखवा नोटीस’, पुन्हा एका एसटी कर्मचाऱ्याच्या जिव्हारी

  •  विष प्राशन करून केली आत्महत्या

नांदेड – मागील अडीच महिन्यांपासून सुरू असलेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप संपण्याचे नाव घेत नाही. सरकार व एसटी कर्मचारी दोघेही आपापल्या मतावर ठाम आहेत. दुसरीकडे, वारंवार आवाहन करूनदेखील कामावर रुजू न झालेल्या कर्मचाऱ्यांवर एसटी महामंडळाने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. अनेक एसटी कर्मचाऱ्यांना एसटी महामंडळाने कारणे दाखवा नोटीस बजावण्यास सुरुवात केली आहे. अशाच एका कारणे दाखवा नोटीस मिळालेल्या कर्मचाऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संभाजी गुट्टे असे या एसटी कर्मचाऱ्याचे नाव आहे.
गेल्या अडीच महिन्यांपासून एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांचे महाराष्ट्र शासनात विलिनीकरण करण्यासाठी आंदोलन सुरू आहे. या आंदोलनामुळे कर्मचाऱ्यांची आर्थिक व मानसिक स्थितीही ढासळली असल्याचे म्हटले जात आहे. संपावर तोडगा निघत नसल्याने आणि एसटी महामंडळाकडून सुरू असलेल्या कारवाईच्या कचाट्यात एसटी कर्मचारी अडकले आहेत. यातून आतापर्यंत नांदेड जिल्ह्यात चार एसटी कर्मचाऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. शुक्रवारी नांदेड जिल्ह्यातील कंधार आगारातील वाहक संभाजी गुट्टे यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली. आगार प्रमुख एस. एम. ठाकूर यांनी दिलेल्या कारणे दाखवा नोटिसच्या भीती पोटी व आगार प्रमुखांच्या कामावर रुजू व्हावे यासाठी लावलेल्या तगाद्यामुळे त्यांनी विष प्राशन केले असल्याचे म्हटले जात आहे. एसटी वाहक संभाजी गुट्टे यांचा एक व्हिडीओदेखील व्हायरल झाला आहे. सदर कर्मचारी ‘मी आगार प्रमुखांच्या दबावामुळे आत्महत्या करणार असल्याचा’ इशारा देत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्याशिवाय त्यांनी कंधार आगार प्रमुखांविरोधात केलेली तक्रारदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. नांदेड जिल्ह्यात एकाच महिन्यात चार एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या करून मृत्यूला कवटाळल्याने एसटी कर्मचाऱ्यांमध्ये संतप्त भावना आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एसटी आंदोलन चिघळण्याची चिन्हे आहेत.

 

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …