कामावर परत या, सर्व मागण्या मान्य होतील; शरद पवारांचे एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन

मुंबई – एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत तोडगा काढण्यासाठी कृती समितीच्या सदस्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची सोमवारी भेट घेतली, तसेच परिवहनमंत्री अनिल परब आणि कृती समितीमध्ये एक बैठकही झाली. ‘सरकारवर विश्वास ठेवा आणि कामावर परत या, तुमच्या सर्व मागण्या मान्य होतील’ असे आवाहन शरद पवार यांनी एसटी कर्मचाऱ्यांना केले आहे, तसेच एसटीच्या विलिनीकरणाचा मुद्दा न्यायप्रविष्ट आहे, त्यामुळे समितीच्या अहवालानंतर त्यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल, असेही म्हटले आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक आहे, एसटीची बांधिलकी प्रवाशांशी आहे, त्यामुळे एसटी सुरू झाली पाहिजे यावर एकमत झाल्याची माहिती शरद पवारांनी दिली. तसेच विलिनीकरणाच्या मुद्यावर राज्य सरकारची भूमिका काय आहे या प्रश्नावर बोलताना ‘आपल्याला यावर राजकारण करायचे नाही. एसटीची बांधिलकी ही प्रवाशांशी आहे. विलिनीकरणाच्या मागणीवर राज्य सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. हा मुद्दा आता न्यायप्रविष्ट असल्याने त्यावर काही भाष्य करणे योग्य नाही’, असे म्हटले आहे.

संप सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केलेत
कृती समिती आणि कामगार समितीचे जेवढे प्रतिनिधी आहेत, त्यांचा कामगारांच्या हिताबद्दलचा जो अर्ज आहे, त्यात प्रवाशांचे हित आणि एसटी टिकली पाहिजे याबाबत उल्लेख आहे. आम्ही कामगारांच्या समस्या मनावर घेणार नाही, असा समज काही लोकांनी पसरवला होता, त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी होती. त्यामुळे हा संप सोडवायला दोन महिने लागले. अन्यथा एवढा वेळ लागलाच नसता. तसेच आम्ही हा संप सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केलेत, असे देखील शरद पवार यांनी म्हटले आहे.

 

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …