४ बाद २५८ धावांवर डाव थांबला
अय्यर-जडेजाची अभेद्य शतकी भागीदारी
कानपूर – कानपूर कसोटी मालिकेच्या पहिल्या दिवशी श्रेयस अय्यर आणि रवींद्र जडेजा यांनी केलेल्या दमदार भागीदारीमुळे या मालिकेवर टीम इंडियाने वर्चस्व मिळवले आहे. श्रेयस आणि जडेजाने पाचव्या विकेटसाठी नाबाद ११३ धावांची भागीदारी केली. भारतीय संघ तब्बल दोन महिन्यांनंतर कसोटी सामना खेळत आहे. आधी आयपीएल मग विश्वचषक अशा टी-२० क्रिकेटच्या ओव्हरडोसनंतर गुरुवारी पुन्हा एकदा भारतीय संघ कसोटी सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये भारताचा पराभव केलेल्या न्यूझीलंडविरुद्ध भारत कसोटी सामना खेळत आहे. यावेळी विराट कोहली विश्रांतीवर असल्याने अजिंक्य रहाणे कर्णधारपद सांभाळत आहे. भारताने नाणेफेक जिंकत फलंदाजीने सामन्याची सुरुवात केली. दिवसअखेरीस भारताने दिलासादायक सुरुवात करीत चार विकेट्सच्या बदल्यात २५८ धावा केल्या. शुभमन गिल, श्रेयस अय्यर आणि रवींद्र जडेजा यांच्या अर्धशतकांमुळे भारताने ही धावसंख्या उभारली.
सामन्याची सुरुवात सलामीवीर शुभमन गिलने उत्तम करून दिली. मयांक अगरवाल (१३) आणि चेतेश्वर पुजारा (२६) यांनी त्याला काहीशी साथ दिली, पण शुभमनने अर्धशतक (५२) झळकावल्यानंतर तोही तंबूत परतला. कर्णधार अजिंक्य रहाणेही ३५ धावा करून बाद झाला. त्यानंतर सलामीचा कसोटी सामना खेळणाऱ्या श्रेयस अय्यरने अनुभवी रवींद्र जडेजासह भारताचा डाव सावरत एक दिलासादायक धावसंख्या उभारली. मुंबईकर श्रेयस अय्यरने कसोटी क्रिकेटमधील पदार्पणातच अर्धशतक झळकावले. श्रेयसने ९४ चेंडूंमध्ये ६ चौकारांसह आपले पहिले अर्धशतक पूर्ण केले. लंचनंतर शुभमन गिल आणि चेतेश्वर पुजारा झटपट बाद झाल्यानंतर श्रेयस मैदानात उतरला होता. त्याने सुरुवातीला अजिंक्य रहाणेसोबत छोटी भागीदारी केली. रहाणे ३५ धावांवर बाद झाल्यानंतर श्रेयसने जडेजाच्या मदतीने भारताचा डाव सावरला.
गुरुवारी खेळ संपला, तेव्हा श्रेयस अय्यर ७५, तर रवींद्र जडेजा ५० धावा काढून खेळत होते. गोलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडकडून जेमिसनने ३ आणि साऊथीने १ विकेट घेतली. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या सामन्यात भारतीय फलंदाजांची डोकेदुखी ठरलेला काईल जेमिसनने ३ विकेट्स मिळवल्याने दुसऱ्या दिवशी (शुक्रवारी)ही त्याला सांभाळूनच भारताला फलंदाजी करावी लागणार आहे. शुक्रवारी श्रेयस अय्यर आणि रवींद्र जडेजा यांच्या खेळीने दुसऱ्या दिवसाच्या सामन्याची सुरुवात होणार आहे. ऋद्धीमान साहा, अक्षर पटेल, रवीचंद्रन अश्विन, ईशांत शर्मा आणि उमेश यादव हे अद्याप खेळायचे आहेत.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …