राहुल गांधींसोबत पाऊण तास खलबते
नवी दिल्ली – देशात एकच आघाडी असेल. तीन-चार आघाड्या निर्माण केल्याने भाजपला पर्याय दिला जाऊ शकणार नाही, असे सांगतानाच काँग्रेसशिवाय कोणतीही आघाडी होऊच शकत नाही. या आघाडीच्या नेतृत्वाचे नंतर ठरेल. पण आघाडी एकच असेल, असे शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी मंगळवारी येथे स्पष्ट केले.
संजय राऊत यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी या दोन्ही नेत्यांमध्ये पाऊण तास खलबते झाली. त्यानंतर राऊत यांनी मीडियाशी संवाद साधत काँग्रेसशिवाय कोणताही आघाडी अस्तित्वात येऊच शकत नसल्याचे स्पष्ट केले. काँग्रेसशिवाय कोणतीही आघाडी होऊ शकत नाही. नवी आघाडी झाली तरी काँग्रेसच्या नेतृत्वातही एखादी आघाडी काम करेलच. विरोधकांची एक बैठक बोलावण्याचा प्रयत्न सुरू आहे. याकामी तुम्ही पुढाकार घ्यावा अशी विनंती मी राहुल गांधींना केली, असेही त्यांनी सांगितले.
या बैठकीत केवळ उत्तर प्रदेशच्या निवडणुकीवरच नाही, तर राष्ट्रीय राजकारणावरही चर्चा झाली. आघाडीचे नेतृत्व कुणी करावे याबाबत मी बोलत नाही. मला वाटते देशात एकच आघाडी असावी. एकच आघाडी बनेल. एकच आघाडी बनायला हवी. एकच आघाडी बनली तरच आपण भाजपला पर्याय देऊ शकतो. आम्ही सर्व एकत्र आहोत आणि एकत्र राहणार आहोत, असेही त्यांनी सांगितले. राहुल गांधी यांच्याशी चर्चा झाली. दीर्घ चर्चा झाली. राजकीय चर्चा झाली. या भेटीतील संदेशच सांगायचा झाला तर सबकुछ ठिक हैं, हाच आमचा संदेश आहे, असे राऊत म्हणाले. या बैठकीत सर्व विरोधकांना एकत्र ठेवण्यावर चर्चा झाली. या विषयावर सर्वांनी चर्चा केली पाहिजे. राहुल गांधी लवकरच मुंबईत येणार आहेत. त्यांचा एक कार्यक्रम आहे. त्यादरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कामाला सुरुवात केली असेल, तर त्यांची आणि राहुल गांधींची भेट होईल, असेही त्यांनी सांगितले.
शरद पवार पुरेसे
टीएमसी आणि काँग्रेसला एकत्र आणण्यासाठी शिवसेना मध्यस्थी करणार का?, असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावेळी टीएमसी आणि काँग्रेसला एकत्र आणण्यासाठी शरद पवार पुरेसे आहेत. ते मजबूत नेते आहेत, असे त्यांनी सांगितले, तसेच बुधवारी प्रियंका गांधी यांच्याशी चर्चा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.