काँग्रेसमुळेच नरेंद्र मोदी आणि भाजप शक्तिशाली – ममता बॅनर्जी

नवी दिल्ली – तृणमूल काँग्रेस अध्यक्ष आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘काँग्रेसमुळे मोदीजी शक्तिशाली’, असे म्हणत निशाणा साधला आहे. ममता यांनी काँग्रेसमुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप इतकी शक्तिशाली होऊ शकली, तसेच काँग्रेसच भाजपसाठी प्रचारक म्हणून काम करत आहे, असे म्हटले आहे. ममता बॅनर्जी सध्या गोवा दौऱ्यावर असून, गोवा विधानसभा निवडणुकीसाठी ममता बॅनर्जींनी प्रचाराला सुरुवात केली आहे.
गोवा विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी राज्याच्या तीन दिवसीय दौऱ्यावर असलेल्या ममतांनी शनिवारी गोवा फॉरवर्ड पार्टीचे प्रमुख विजय सरदेसाई यांच्यासोबत एक सभा घेतली. येत्या विधानसभा निवडणुकीसाठी या दोन्ही पक्षांनी आघाडी केली आहे. यावेळी ममतांनी भाजपसोबतच काँग्रेसवरही सडकून टीका केली. काँग्रेस हा भाजपचा टीआरपी आहे. काँग्रेसमुळेच मोदी अधिकाधिक बळकट होत आहेत. काँग्रेस निर्णय घेण्यात कमी पडत असल्यामुळे त्याचा फटका देशाला बसतो. या पक्षाला आतापर्यंत पुरेशी संधी मिळाली; मात्र ते जनतेला आपल्याकडे खेचून भाजपला रोखू शकले नाहीत. बंगालमध्ये ते भाजपऐवजी माझ्याविरोधात लढले. मी त्यांच्यावर विश्वास तरी कसा ठेऊ? भाजपला पराभूत करण्यासाठी विरोधकांच्या एकजुटीची गरज आहे, हे काँग्रेसला कळालेलेच नाही, असा घणाघात ममतांनी केला. भाजपविरोधात लढून देशाची संघराज्य व्यवस्था टिकवायची असेल, तर प्रादेशिक पक्षांना सोबत घ्यावेच लागेल; मात्र काँग्रेस प्रादेशिक पक्षांना महत्त्व देण्यास तयार नाही. माझा पक्ष प्रादेशिक आहे आणि इतर प्रादेशिक पक्ष देखील बळकट झाल्याचे मला बघायचे आहे. प्रत्येक राज्य बळकट झाले, तर देश बळकट होईल. त्यामुळेच तृणमूल काँग्रेसने गोवा फॉरवर्ड पक्षासोबत आघाडी केली आहे, असे ममतांनी सांगितले.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …