काँग्रेसकडून बाबासाहेबांचा त्यांच्या हयातीत आणि नंतरही सातत्याने अपमान

  •  अमित शहांचा काँग्रेसवर हल्लाबोल

पुणे – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाचे ‘संविधान’ लिहून या देशाला आकार दिला. त्यांनी देशाच्या विकासात मोठे योगदान दिले, मात्र काँग्रेसने त्यांच्या हयातीत आणि नंतरही त्यांचा सातत्याने अपमान केला, अशी घणाघाती टीका भाजप नेते आणि गृह व सहकारमंत्री अमित शहा यांनी काँग्रेसवर केली.
अमित शहा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. रविवारी ते पुण्यात होते. शहा यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पायाभरणी आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी झालेल्या कार्यक्रमात त्यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली. बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या हयातीत आणि नंतरही अपमानित करण्याचे काम काँग्रेसने सातत्याने केले. गैरकाँग्रेसी सरकार असतानाच बाबासाहेबांना ‘भारतरत्न’ देण्यात आला. काँग्रेसची सत्ता असताना त्यांना भारतरत्न दिला गेला नाही. देशातील जनतेला बाबासाहेबांचे काम आणि त्यांची थोरवी कळू नये म्हणून काँग्रेसने कधीच संविधान दिवस साजरा केला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेवर येताच संविधान दिवस साजरा करण्यास सुरुवात केली. जेव्हा-जेव्हा आम्ही संविधान दिवस साजरा केला. त्या-त्या वेळी काँग्रेसने त्यावर बहिष्कार टाकला, असा हल्ला शहा यांनी काँग्रेसवर चढवला. स्वातंत्र्यानंतर संविधान बनविण्यात बाबासाहेबांचे मोठे योगदान राहिले आहे. सर्व वादग्रस्त मुद्यांवर सर्वांना एकत्र आणण्याचे काम बाबासाहेबांनी केले. दलित वंचितांना संविधानातून संरक्षण देण्याचे काम त्यांनी केले. संपूर्ण आयुष्यभर त्यांनी अपमान सहन केला. कटु अनुभव घेतले, पण संविधान निर्मिती करताना त्यांनी कधी त्यात कटुता येऊ दिली नाही. जगभरात आपले संविधान सर्वश्रेष्ठ आहे. सर्वांना समान अधिकार देणारे संविधान आहे हे केवळ बाबासाहेबांमुळेच घडू शकले, असे शहा म्हणाले. मोदीही भारताच्या संविधानाला आपला ग्रंथ मानून देश चालवत आहेत, असेही ते म्हणाले.

तसेच जेव्हा देशात अंधारयुग होते. आशेचा एक किरणही दिसत नव्हता. स्वराज्य आणि स्वधर्म शब्द उच्चारणेही जेव्हा कठीण होते. त्या काळात शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा संकल्प केला आणि संपूर्ण आयुष्य स्वराज्यासाठी वेचले. त्यांच्या या प्रयत्नामुळेच हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली. केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर देशातील दोन तृतीयांश शहरात स्वराज्य मिळवण्याचे सौभाग्य मिळाले, असे त्यांनी सांगितले. शिवाजी महाराजांनी आपल्या अष्टप्रधान मंडळाद्वारे प्रशासनाची पायाभरणी केली. न्याय, नाविक दल, प्रशासकीय काम आदी गोष्टी त्यांनी प्रत्यक्षात उतरवल्या, असेही त्यांनी सांगितले.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …