ठळक बातम्या

कसे जेवावे

मुकाट्याने खाली मान घालून न बोलता जेवा. असा जेव्हा दटावणीतील आवाज यायचा, तेव्हा अचानक कलकलाट बंद होऊन निमुटपणे फक्त घास चावतानाचे, ताटातील वाट्या व पेल्यांचे आवाज कानावर पडत. आम्ही पोरे पंगतीत बसतानाच कलकलाट सुरू करायचो. इतका की, जवळपास बसलेल्या ज्येष्ठांचे मस्तक ठणकायचे. त्यातील एखादा दमदार व्यक्ती आपला अस्सल आवाज काढून आमचा आवाज घशातच दाबायचा.
अन्न कशा पद्धतीने जेवले पाहिजे, त्याबद्दल सविस्तर लेख वाचनात आलेले नाहीत. मी काही प्रयोग केले व त्यातून मला जी अनुभूती मिळाली, त्यावर आधारित मी हा लेख आपल्या समोर मांडत आहे.

मानव प्रगती करू लागला, त्याचा सर्वांगाने विकास होऊ लागला. हे होत असताना, त्याने खाण्या-पिण्याच्या आपल्या सवयी बदलल्या किंवा त्याला बदलाव्या लागल्या. त्यातून त्याचा फायदा होण्यापेक्षा नुकसान जास्त झाले आहे. मी काही आहारतज्ज्ञ नाही, त्यामुळे त्या विषयाशी संबंधित काही भाष्य करणार नाही, तर केवळ स्वानुभव सांगण्याचा प्रयत्न करत आहे. पूर्वी घरात पाटावर बसून समोर ताट खाली ठेऊन जेवण्याची प्रथा होती; पण आजकाल आपण डायनिंग टेबलचा वापर करतो, त्यात गैर आहे, असेही मी मानत नाही. खाली किंवा टेबलावर बसून, कसे जेवायचे व त्यामुळे काय फायदे होतात, इतकेच दर्शवणारा हा लेख आहे.
सर्वांना हे माहीत आहेच की, हात स्वच्छ धुऊन जेवायला बसावे. जेवण्यास सुरुवात केल्यावर शक्यतो बोलणे टाळावे, असे केल्याने जेवण्याचा आस्वाद घेता येतो, तसेच जीभ, गाल व ओठ आपल्याच दाताने चावल्यामुळे होणारी इजा टळते. अनेकवेळा जीभ, ओठ, गाल चावले जातात, याचे कारण लक्ष जेवणात नसून टीव्हीवरच्या सिरिअलमध्ये असते, किंवा उगीच आपण बडबड करतो, ज्यामुळे आपल्या मेंदूचे एकाचवेळी अनेक क्रिया करताना, योग्य नियंत्रण राहत नाही व असा अपघात घडतो.

जेवणाच्या ताटाकडे आरशात पाहिल्यासारखे करून घास तोंडात घ्यावा. घास तोंडात घेतला की, ओठ बंद करावे व घास चावण्यास आरंभ करावा. घास संपूर्ण चावून गिळेपर्यंत मान वाकलेल्या स्थितीत म्हणजे जवळपास ९० अंशात ठेवल्यास, मुबलक प्रमाणात ग्रंथीतून लाळ स्त्रवते व घासात ती भरपूर मिसळल्याने, पुढे पचनक्रियेसाठी फायदा होतो. जर आपण मान सरळ ठेऊन म्हणजे टीव्हीकडे पाहत घास चावत राहिलो, तर योग्य प्रमाणात लाळ मिसळली जात नाही, तसेच घासाचा पूर्ण भुगा न होता घास घशातून अन्ननलिकेत ढकलला जातो. त्यामुळे अर्धवट चावलेला घास अन्ननलिकेत सरकून पोटात गेल्याने अपचन होण्याची शक्यता वाढते.
खरं तर, चावलेला घास आपोआप अन्ननलिकेत न जाता आपल्या इच्छेने गेला पाहिजे. मान खाली ठेऊन चावत राहिल्याने घास घशात पोहोचतच नाही, तो दातांच्या कचाट्यात राहतो व तिथेच फिरत राहून त्याचे पेस्ट किंवा घट्ट रसात रूपांतर होते. असे झाले हे समजले की, मगच मान वर केल्यास घास घशात जाऊन पुढे आपोआप अन्ननलिकेत जाईल, ज्याला यथार्थपणे गिळणे म्हणता येईल.

एक मात्र खरे, असे जेवण करायला आपल्याला किमान अर्धा तास द्यावा लागेल, यातून एक घास बत्तीसवेळा चावण्याची अनुभूती आपल्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही. लाळ ग्रंथी जिभेच्या खाली असतात, त्यांचे तोंड दातांच्या बाजूने उघडते व जिभेच्या दाबाने लाळ सर्वत्र पसरते. तिथेच घासाची भुकटी होत असते, तेव्हाच त्यात लाळ मिसळत राहिल्याने आणि ठराविक वेळ चावल्याने, रासायनिक प्रक्रियेने घासाची काही प्रमाणात साखरेत रूपांतरित होण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने, आपल्याला घासात गोडवा जाणवू लागतो, तोच घास पूर्णपणे चावला गेला असे समजावे.
थोरामोठ्यांचे बोल कडू वाटले, तरी शास्त्रीयदृष्ट्या ते योग्य असतात, याच्या अनेक उदाहरणांपैकी हे पण एक उदाहरण आहे. गाई, म्हशी चारा भसाभस खातात व आराम करताना, पोटातील अन्न पुन्हा बाहेर काढून चावून, भुगा करून खातात. ज्याला रवंथ करणे म्हणतात, ही देणगी निसर्गाने मानवाला दिलेली नाही, तसेच कुत्रा, मांजर यांच्या पोटात जहाल रसायने बनतात जी हाडेसुद्धा विरघळून टाकतात. ती पण देणगी आपल्याला नाही. आपल्या पोटात होणारी रासायनिक प्रक्रिया ठोस कणांना किंवा दाण्यांचा भुगा करू शकत नाही व ते विष्ठेतून आहे, तसेच बाहेर पडतात. याचा परिणाम म्हणजे ऊर्जा उत्पन्न करण्यासाठी साखर (ग्लुकोज) बनवण्याची, आपल्या शरीराची कार्यक्षमता मंदावते व वेळेआधीच भूक लागते. खाण्याची इच्छा लवकर जागृत होते.

म्हणून मुकाट्याने, मान खाली घालून जेवणे हिच योग्य रित आहे. जिचा अवलंब काटेकोरपणे केल्यास अपचनाचा विकार होणार नाही. जेवण झाल्यावर तटावरून उठण्याआधी खालील शब्दांचे तीनवेळा उच्चारण करावे.
अन्नदातेचि दिसती सर्व । कवणा म्हणावें सुखी भव ।

‘अन्नदाता सुखी भव:’
– विजय लिमये/9326040204\\

About Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …