इगतपुरी – राज्यात गुटखा बंदी असतानाही कोणत्या ना कोणत्या मार्गे गुटख्याची तस्करी केलीच जाते. असाच काही प्रकार कसारा घाटात घडला. मुंबई-नाशिक महामार्गाच्या लगत, कसारा घाट परिसरातील घाटनदेवी मंदिर शिवारात घोटी केंद्र पोलिसांनी चक्क ३३ पोते गुटखा जप्त केला आहे. या गुटख्याची किंमत अंदाजे २५ ते ३० लाख रुपये आहे.
महामार्ग घोटी केंद्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे यांना दूरध्वनीवरून लाखो रुपयांचा गुटखा बेवारस स्थितीत पडल्याचे खबऱ्याने माहिती दिली होती. त्यानंतर वालझाडे यांनी तातडीने आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेत समक्ष पाहणी करून दिलेली खबर पक्की असल्याची खात्री केली आणि इगतपुरी पोलीस ठाण्याला कळविले. पांढऱ्या रंगाच्या ३३ पोत्यांमध्ये हा गुटखा होता. महामार्ग पोलीस पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे, पोलीस हवालदार संतोष गांगुर्डे, जितेंद्र पाटोळे, राम वारुंगसे, जगदीश जाधव आणि इगतपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वसंत पथवे यांनी संपूर्ण गुटखा ताब्यात घेत अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. अन्न व औषध प्रशासनाकडून मोजमाप झाल्यावर या गुटख्याची किंमत वाढू शकते, असा अंदाज आहे. दरम्यान, दुर्गम माळरानावर संबंधित गुटख्याची उलाढाल व ने-आण कोण करीत आहे, याबाबत इगतपुरी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. महामार्ग पोलिसांनी सराईत गुन्हेगारी वृत्तीच्या इसमाच्या मुसक्या आवळून त्यांना जेरबंद करण्याची मोहीम सुरू केली आहे.