ठळक बातम्या

कर्तारपूर कॉरिडॉर पुन्हा सुरू करावा; पाकिस्तानची भारताला विनंती

नवी दिल्ली – भारताने पुन्हा एकदा आपल्या बाजूने कर्तारपूर कॉरिडॉर खुला करावा, असे आवाहन पाकिस्तानने भारताला केले आहे. कर्तारपूर हे शीख धर्मियांचे पवित्र स्थळ आहे, त्यांना गुरु नानक देव यांच्या जयंतीनिमित्त कर्तारपूरला जाण्याची परवानगी देण्यात यावी, असे पाकिस्तानने म्हटले आहे. याबाबत पाकच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडून माहिती देण्यात आली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी ९ नोव्हेंबर, २०१९ रोजी गुरु नानक देव यांच्या ५५०व्या जयंतीनिमित्त कर्तारपूर कॉरिडॉरचे उद्घाटन केले होते. कर्तारपूर कॉरिडॉरमुळे भारतातील शीख बांधवांना पवित्र स्थळ असलेल्या कर्तारपूरला जाण्याचा मार्ग मोकळा झाला होता; मात्र त्यानंतर अवघ्या काही महिन्यांतच जगभरात कोरोना महामारीने थैमान घातल्याने हा मार्ग बंद करण्यात आला होता.
याबाबत बोलताना पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, आतापर्यंत भारताने आपल्या बाजूने कर्तारपूर कॉरिडॉर सुरू केलेला नाही. कर्तारपूरमध्ये गुरु नानक देव यांच्या जयंतीनिमित्त येत्या १७ ते २६ नोव्हेंबरदरम्यान मोठा उत्सव आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे भारताने कर्तारपूर कॉरिडॉर खुला करून शीख बांधवांना कर्तारपूरमध्ये येण्याची परवानगी द्यावी. पाकिस्तान येणाऱ्या सर्व भाविकांचे स्वागत करण्यास उत्सुक आहे, असे इम्रान खान यांनी म्हटले आहे.
त्यापूर्वी पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांनी मंगळवारी पंजाबस्थित असलेल्या डेरा बाबा नानकला भेट दिली. त्यांनी भारत-पाक सीमेवरूनच पाकिस्तानमध्ये असलेल्या कर्तारपूर साहिबचे दर्शन घेत, प्रार्थना केली. प्रार्थनेनंतर बोलताना ते म्हणाले की, आता दोन्ही देशांनी कर्तारपूर कॉरिडॉर पुन्हा एकदा सुरू करावा, ज्यामुळे शीख बांधवांना कर्तारपूरला जाऊन दर्शन घेता येईल. दुसरीकडे, पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी देखील कर्तारपूर कॉरिडॉर भाविकांसाठी पुन्हा एकदा सुरू करण्यात यावा, अशी मागणी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीदरम्यान त्यांनी ही मागणी केली होती.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …