करुणा धनंजय मुंडे यांची नव्या शिवशक्ती पक्षाची घोषणा

राज्यातील सर्व निवडणुका लढवणार

अहमदनगर – करुणा धनंजय मुंडे यांनी गुरुवारी आपल्या नव्या पक्षाची घोषणा केली. शिवशक्ती सेना असे त्यांच्या नव्या पक्षाचे नाव असणार असून, हा पक्ष महाराष्ट्रातील सर्व निवडणुका हा पक्ष लढवणार असल्याची माहिती मुंडे यांनी दिली, तसेच यावेळी त्यांनी महाराष्ट्र भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी काम करणार असल्याचे म्हणत भ्रष्टाचारमुक्ती आणि समाजासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी पक्षात येण्याचे आवाहन केले. अहमदनगरमध्ये जानेवारी महिन्याच्या अखेरीस मोठा मेळावा घेऊन पक्षाचे चिन्ह, पक्षाचा झेंडा, बोधचिन्ह आणि निवडणूक लढवण्यासंदर्भातील आचारसंहिता जाहीर केली जाणार असल्याची माहिती करुणा शर्मा यांनी दिली आहे.
महाराष्ट्रामध्ये हजारो कोटींचे घोटाळे होतात, तसेच घोटाळ्यामुळे अनेक परीक्षा रद्द झाल्या आहेत. पक्षात येण्यापासून निवडणूक लढवणे आणि मंत्री होईपर्यंत कोट्यवधी रुपये दिल्याशिवाय पदे मिळत नाहीत. एक-एक मंत्री दीड ते दोन हजार कोटींचे घोटाळे करतो. हा सर्व भ्रष्टाचार संपवायचा आहे. त्यासाठी माझा पक्ष काम करेल, अशी घोषणाही मुंडे यांनी केली. भ्रष्टाचार मंत्री करतात आणि अधिकारी, पोलीस अधिकारी बळी दिले जातात, हे मी २५ वर्षे पाहिलेले आहे. त्यामुळे आता हे संपवायचे असल्याचे त्या म्हणाल्या.
३० जानेवारी रोजी अहमदनगरमध्ये एक मोठा मेळावा होईल. त्या मेळाव्यामध्ये पक्षाचे चिन्ह, पक्षाचा झेंडा, बोधचिन्ह आणि निवडणूक लढवण्यासंदर्भातली आचारसंहिता जाहीर केली जाणार असल्याची माहिती मुंडे यांनी दिली. ‘भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र करणे हे माझे स्वप्न आहे. त्यामुळे या क्षेत्रात काम करणारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेण्याची माझी इच्छा होती. अनेक वेळा त्यांच्याशी संपर्क केला, मात्र त्यांनी भेटीची वेळ दिली नाही. राळेगणसिद्धी येथे सुद्धा त्यांच्या घराबाहेर दोन तास प्रतीक्षा करत थांबले होते. परंतु, मला भेट मिळाली नाही, याची खंत वाटते, असेही त्या म्हणाल्या.
परळीतून निवडणूक लढण्याची चिन्हे
काही महिन्यांपूर्वी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांची करुणा शर्मा यांनी भेट घेतली होती. त्यानंतर करुणा यांनी आपण समाजसेविका आहोत. पुढे राजकारणातही येणार, असे सांगितले होते. इतकंच नाही तर आपल्याला आमदारकीची निवडणूक लढवायची असल्याचा मानसही करुणा यांनी बोलून दाखवला होता. तसे झाल्यास विद्यमान आमदार धनंजय मुंडे यांना शर्मांचे आव्हान असेल.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …