
नवी मुंबई : कपडे खरेदी करण्याच्या बहाण्याने खारघर सेक्टर-35 मधील एमएफसी बुटीक या कपडयाच्या दुकानात गेलेल्या एका भामटयाने 25 हजार रुपये किंमतीचे 50 लेडिज ड्रेसची खरेदी करुन सदर ड्रेसची रक्कम न देता सदरचे कपडे घेऊन रिक्षामधुन पलायन केल्याची घटना उघडकिस आली आहे. खारघर पोलिसांनी या भामटया विरोधात फसवणुकिचा गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरु केला आहे.
खारघर सेक्टर-35 मध्ये रहाणाऱया मोनिका सदानी (32) यांचे त्याच भागात एमएफसी बुटीक या नावाने कपडयाचे दुकान आहे. गत 25 नोव्हेंबर रोजी एक भामटा त्यांच्या दुकानात कपडे खरेदी करण्याच्या बहाण्याने गेला होता. यावेळी त्याने त्याच्या घरी भरपुर पाहुणे आले असल्याने त्याला भरपुर कपडे हवे असल्याचे सांगून मोनिका यांना कपडे दाखविण्यास सांगितले. त्यानुसार मोनिका यांनी त्याला लेडिज कपडे दाखविले असता, त्याने त्या कपडयामधुन 50 कुर्ती ड्रेस निवडून त्याचे बिल बनवण्यास सांगितले. त्यानुसार मोनिका यांनी 25 हजार रुपयांचे बिल बनवून त्यांच्याकडे कामाला असलेल्या मोहम्मद याच्याकडे बिल व कपडे दिल्यानंतर सदर भामट्याने मोहम्मदला पैसे देण्याच्या बहाण्याने दुकानाच्या बाहेर नेले. त्यानंतर त्याने मोहम्मदकडून कपडे घेऊन त्याला पैसे न देता, रिक्षामधून पलायन केले. या प्रकारानंतर मोहम्मदने आपली मालकिण मोनिका यांना सदर प्रकाराची माहिती दिल्यानंतर त्यांनी सदर भामट्या ची शोधा-शोध केली. मात्र तो न सापडल्याने त्यांनी खारघर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात भामटया विरोधात फसवणुकिचा गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरु केला आहे.