नागपूर- देवलापारवरून काम संपवून नागपूरकडे परतणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचा अपघातात मृत्यू झाला. ट्रॅव्हल्सने बाइकला धडक दिल्याने गोपीचंद कांबळे (५१) हे घटनास्थळीच ठार झाल्याची घटना शुक्रवारी घडली.
प्राप्त माहितीनुसार, गोपीचंद कांबळे हे शुक्रवारी सकाळी देवलापारवरून नागपुरातील डिगडोहकडे बाइकने परत येत होते. नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर डुमरी स्टेशनजवळ महामार्गाचे काम सुरू आहे. यामुळे एकाच बाजूचा रस्ता सुरू आहे. डुमरी स्टेशनजवळ नागपूरकडून जबलपूरकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्स चालकाने गोपीचंद यांच्या बाइकला धडक दिली. या अपघातात गोपीचंद यांच्या डोके, दोन्ही हात आणि पायाला गंभीर मार लागला. रक्तस्त्राव झाल्याने गोपीचंद यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. माहिती मिळताच कन्हानचे पोलीस घटनास्थळी तातडीने दाखल झाले, तसेच राहुल रंगारी यांच्या तक्रारीवरून ट्रॅव्हल्स चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.