औषध निरीक्षकांच्या पदासाठी एमपीएससीने काढलेल्या जाहिरातीला तूर्तास स्थगिती

मुंबई – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) नुकतेच औषध निरीक्षकांच्या पदासाठी काढलेल्या जाहिरातीला तूर्तास स्थगिती दिली आहे. औषध निरीक्षकाच्या ८७ पदांसाठी परीक्षा होणार आहे. तीन वर्षांच्या अनुभवाच्या अटीवर विद्यार्थ्यांचा आक्षेप आहे.

ड्रग्ज इन्स्पेक्टर या पदासाठी एमपीएससीने १७ नोव्हेंबर २०२१ ला एक जाहिरात प्रसिद्ध केली होती, पण यासाठी तीन वर्षांच्या अनुभवाची अट टाकण्यात आली होती. त्यामुळे या परीक्षेची गेली अनेक वर्षे तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले होते. एमपीएससीच्या या अटीच्या निर्णयामुळे हजारो विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येणार नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे नुकसान होणार होते. ड्रग्ज इन्स्पेक्टर या पदासाठी अर्ज करण्यासाठी ८ डिसेंबर २०२१ ही शेवटची तारीख होती. या परीक्षेसाठी बी. फार्मसी केलेले विद्यार्थी पात्र असतात. नुकतेच पदवी फार्मसी झालेले विद्यार्थी रोजगाराच्या शोधात असताना मग तीन वर्ष अनुभव घेतलेले आर्थिक सक्षम किंवा स्थिर लोकांना सेवेत घेऊन काय साध्य होणार आहे, असा सवाल विद्यार्थ्यांकडून विचारला जात होता. जर अनुभवाची अट ठेवायची असेल, तर इतर राज्यसेवा परीक्षांसारखा प्रोबेशनरी पिरेड ठेवावा, अशीही मागणी करण्यात येत होती. एमपीएससीने बी. फार्मसी पदवीला प्रोफेशनल पदवी म्हणून मान्यता द्यावी आणि फॉरेस्ट ऑफिसर तसेच महिला बालविकास अधिकारी आणि आरोग्य विभागाच्या समकक्ष पदासाठी सुद्धा पात्र करावे, अशी मागणीही विद्यार्थ्यांकडून केली जात होती. विद्यार्थ्यांच्या या मागणीनंतर एमपीएससीने काढलेल्या जाहिरातीला तूर्तास स्थगिती देण्यात आली आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …