औरंगाबादेत शिवसेनेचा आक्रोश मोर्चा : या आक्रोशामुळे दिल्लीतील तख्तही हादरेल – राऊत

औरंगाबाद – देशात पेट्रोल, डिझेल, गॅस, खाद्यतेल आदी सर्वच जीवनावश्यक वस्तूंचे दर प्रचंड प्रमाणात वाढले असून, याकरिता केंद्र सरकार जबाबदार असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे आणि या वाढत्या महागाईिवरोधात शनिवारी औरंगाबादमध्ये शिवसेनेच्या वतीने आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले. औरंगाबादचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या क्रांती चौकातून या मोर्चाची सुरुवात झाली. या मोर्चात शेकडो शिवसेना कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी जनतेला संबोधित करताना संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर सडकून टीका केली.
भाषणात बोलताना संजय राऊत म्हणाले, महागाईिवरोधात शिवसेनेच्या या आक्रोशाची ठिणगी संभाजीनगरात पडली आहे. या महाराष्ट्रानं देशाला दिशा दिली आहे. मराठवाड्यानं महाराष्ट्राला लढण्याची प्रेरणा दिली आहे. हा इतिहास पाहता आम्ही मराठवाड्याची राजधानी संभाजीनगरातून या आक्रोश मोर्चाला सुरुवात केली आहे. ही तर सुरुवात असून, या ठिणगीचा वणवा थेट दिल्लीपर्यंत पोहोचेल. या आक्रोशामुळे दिल्लीतील केंद्र सरकारचे तख्तही यामुळे हादरेल, असा इशारा राऊत यांनी दिला.

महागाईवर आणि केंद्र सरकारच्या धोरणावर टीका करताना संजय राऊत म्हणाले, गेल्या दोन वर्षांत सुमारे १७ हजार लहान मोठ्या व्यापाऱ्यांनी आर्थिक संकट आणि महागाईच्या कारणामुळे आत्महत्या केली; मात्र केंद्र सरकारला याची चिंता नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत:साठी तब्बल १८ कोटी रुपयांचे विमान खरेदी केले. त्यामुळे अशा सरकारचं करायचं काय, असा प्रश्न पडला आहे, असेही ते म्हणाले. काही वर्षांपूर्वी ७५ पैशांना असलेला साधा माचिस बॉक्सही २ रुपयांना झाल्याचं त्यांनी यावेळी लक्षात आणून दिलं.
राज्य सरकारमध्ये मुख्यमंत्री शिवसेनेचे असूनही आंदोलन का करताय, असा प्रश्न विचारला जातोय, त्यावर संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिलं. राज्यात सत्तेत असूनही सरकारला काम करू द्यायचे नाही, अशी कारस्थानं चालवली जात आहेत. रोज महाविकास आघाडीच्या दारात ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सची यंत्रणा आणून उभी करायची, सरकारची नाकेबंदी करायची, अशी कारस्थानं केवळ उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदावरून हलवण्यासाठी सुरू आहेत. याद्वारे मुख्य प्रश्नांवरून जनतेचं लक्ष हटवण्याचं काम सुरू आहे, म्हणून आम्ही आंदोलन करतोय, असं स्पष्टीकरण संजय राऊत यांनी दिलं.

 

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …