औरंगाबादेत दुसरीतल्या मुलीची गळफास घेऊन आत्महत्या?; नातेवाईकांना मात्र वेगळाच संशय

औरंगाबाद – येथील करमाड परिसरात अत्यंत धक्कादायक अशी घटना घडली असून, पोलीसच नाही, तर लोकांनाही त्यावर विश्वास बसत नाही. येथे ८ वर्षीय चिमुकलीचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याचे समोर आले आहे. ही आत्महत्या असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असले, तरीही या मुलीचे वय पाहता, ती आत्महत्या कशी करेल, असा संशय व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे या घटनेवेळी मुलीचा बाप मद्यधुंद अवस्थेत आढळून आल्याने बापानेच काहीतरी घात केल्याची शंका नातेवाईकांना आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातल्या करमाडमधील गोलटगाव येथील या घटनेने शहरात खळबळ माजली आहे. सोमवारी दुपारच्या सुमारास गोलटगाव येथील घरात ८ वर्षीय मुलीचा मृतदेह आढळून आला. सदर मुलीने गळफास घेतल्याचे प्रथमदर्शनी दिसते, मात्र करमाड पोलीस घटनास्थळी दाखल झाले, त्यावेळी मुलीचा बाप घरात मद्यधुंद अवस्थेत आढळून आला. त्यामुळे बापानेच मुलीला मारल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला. याप्रकरणी करमाड पोलीस अधिक तपास करीत आहेत. दरम्यान, या घटनेनंतर संपूर्ण गावाला हादरा बसला आहे. सदर मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच या घटनेतील सत्य उघड होईल, असे पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही मुलगी दुसऱ्या इयत्तेत शिकत होती. तिची आई काही दिवसांपूर्वी भाऊबीजेनिमित्त माहेर सोनक पिंपळगाव येथे गेली होती. त्यामुळे घरात ही मुलगी, तिची मोठी बहीण, आजी आणि वडीलच होते. आजी आणि मोठी बहीण कापूस वेचण्यासाठी शेतात गेले तर वडील घरी असताना तीन वाजेच्या सुमारास मुलीने गळफास घेतल्याचे कळले. दरम्यान, गावातील पोलीस पाटलांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी मुलीला घाटी रुग्णालयात दाखल केले होते, याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …