औरंगाबादेत गुंठेवारी प्रश्नावरून मनसे आक्रमक

  • मुंबईप्रमाणे मालमत्ता करात सवलत देण्याची मागणी

औरंगाबाद – शहरातील अनेक भागांतील नागरिक गुंठेवारीच्या मालमत्तामध्ये राहतात. त्यांच्या करात मनपाने अन्यायकारक वाढ केली आहे. मुंबईत ५०० चौरस फूट मालमत्ता असणाऱ्या नागरिकांना मालमत्ता करात माफी देण्यात आली, मग औरंगाबादकरांवर अन्याय का?, असा सवाल करत औरंगाबादमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी बुधवारी रस्त्यावर उतरत आंदोलन केले. मनसे शहराध्यक्ष सुमित खांबेकर यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले. मागील महिन्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे औरंगाबादमध्ये येऊन गेले. त्यावेळी पक्षाच्या कार्यकारिणीत मोठे बदल करण्यात आले. आता नव्या नेतृत्वात औरंगाबाद मनसेचे हे पहिलेच आंदोलन आहे.
सोमवारी औरंगाबादेत पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. यावेळी सुभाष देसाई यांनी हळूहळू राज्यात सर्वत्रच ५०० चौरस फुटांपर्यंतच्या मालमत्तांचा कर माफ होईल, असे सांगितले. मात्र पालकमंत्र्यांची केवळ तोंडी पोकळ आश्वासने आम्हाला नको आहेत. ठोस निर्णय घ्यावा लागेल, असा आक्रमक पवित्रा मनसेने घेतला आहे. दरम्यान, राज्यशासनाने मुंबई येथे मालमत्ता कर माफ केला आहे. त्या धर्तीवर औरंगाबाद येथे देखील २०२१ पर्यंतचा मालमत्ता कर माफ करण्यात यावा. गुंठेवारी क्षेत्रात राहणारे नागरिक निम्न व मध्यम वर्गातील आहेत. मागील कोरोना काळातील बेरोजगारी व आर्थिक चणचण लक्षात घेता अनेक लोकांना शुल्क एकदम भरणे अशक्य आहे. त्यामुळे अवाजवी शुल्क कमी करून शुल्क भरण्यासाठी हप्ते पाडून देण्यात यावे. हा सामान्य नागरिकांचा प्रश्न प्रशासनापर्यंत पोहचवण्यासाठी बुधवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे घंटानाद करण्यात आला. या मागण्या पूर्ण करण्यात आल्या नाही, तर हे जनआंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही मनसेच्या वतीने देण्यात आला आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …