ओमिक्रॉन : पंतप्रधान मोदींनी बोलावली बैठक

नवी दिल्ली – भारतात ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे. सध्या देशातील ओमिक्रॉनबाधितांची संख्या २१४ इतकी झाली आहे. देशात ओमिक्रॉनचा वाढता धोका लक्षात घेता, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी बैठक बोलावली आहे. पंतप्रधान मोदी या बैठकीत देशातील कोविड परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्यांना पावले उचलण्यास सांगितले आहे. दिल्ली आणि महाराष्ट्रात ओमिक्रॉनचे सर्वाधिक ५४-५४ रुग्ण सापडले आहेत.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, २१४ पैकी ९० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तेलंगणामध्ये ओमिक्रॉनची २४ प्रकरणे आहेत. त्याच वेळी कर्नाटकात १९, राजस्थानमध्ये १८, केरळमध्ये १५, गुजरातमध्ये १४ रुग्ण आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये ३ ओमिक्रॉन रुग्णांची पुष्टी झाली आहे, तर ओडिशा, आंध्र प्रदेश आणि यूपीमध्ये २-२ प्रकरणे आहेत. चंदिगड, लडाख, तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये प्रत्येकी एक ओमिक्रॉन रुग्ण आहे.
ओमिक्रॉनच्या वाढत्या रुग्णांमुळे केंद्र सरकारने चिंता व्यक्त केली आहे. केंद्रीय आरोग्य सचिवांनी राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून ओमिक्रॉनच्या प्रतिबंधासाठी पावले उचलण्यास सांगितले आहे. पत्रात असे म्हटले आहे की, विद्यमान वैज्ञानिक पुराव्याच्या आधारावर, ओमिक्रॉन डेल्टा प्रकारापेक्षा कमीतकमी तीन पट जास्त संसर्गजन्य आहे, तसेच पत्रात पुढे म्हटले आहे की, डेल्टा अजूनही देशाच्या विविध भागांमध्ये आहे. म्हणून, स्थानिक आणि जिल्हा स्तरावर अधिक दूरदृष्टी, डेटा विश्लेषण, वेगवान निर्णय, कठोर आणि जलद नियंत्रण कारवाईची आवश्यकता आहे. राज्य आणि जिल्हा स्तरावर तातडीने निर्णय घ्यावे लागतील, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी राज्य सरकारांना हे पत्र लिहिले आहे. राज्यांना चाचण्या वाढवण्याच्या आणि कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी रुग्णालये सज्ज ठेवण्याच्या सूचना राजेश भूषण यांनी या पत्राद्वारे दिल्या आहेत. ज्या जिल्ह्यांमध्ये संसर्गाचे प्रमाण १० टक्क्यांपेक्षा जास्त आहे, तेथे टेस्टिंग वाढवणे खूप आवश्यक आहे. कठोर प्रतिबंधात्मक उपायांचा अवलंब करावा आणि गरजेनुसार स्थानिक पातळीवर रात्रीची संचारबंदीसारखे निर्बंध देखील लावावेत. याशिवाय मोठ्या मेळाव्यांवर बंदी आणावी आणि लग्नासारख्या समारंभात लोकांची संख्या कमी करावी, अशा सूचना त्यांनी केल्या आहेत. सर्व राज्यांना लसीकरण वाढवून १०० टक्के लसीकरणाचे लक्ष्य पूर्ण करण्यास सांगण्यात आले आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …