मुंबई – ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे मुंबईकरांची चिंता पुन्हा एकदा वाढली आहे. राज्यात शुक्रवारी काही नव्या रुग्णांची नोंद झाली. यातील तीन रुग्ण हे मुंबईतील आहेत. सर्वात चिंतेची बाब म्हणजे गर्दीचे ठिकाण असलेल्या धारावीत परदेशातून आलेल्या एका व्यक्तीला ओमिक्रॉन झाल्याची माहिती मिळताच प्रशासन सतर्क झाले. ही व्यक्ती टांझानियाहून धारावीत दाखल झाली होती. या सर्व घडामोडीमुळे पुन्हा एकदा धारावी पॅटर्न राबवले जाणार आहे. त्यासाठी प्रशासनाने काही नियोजन आखले आहे.
यासाठी ‘फोर टी फॉर्म्युला’ म्हणजेच ट्रेसिंग, ट्रॅकींग, टेस्टींग, ट्रिटींग यांचा आधार घेतला जाणार आहे. यात धारावीतील नागरिकांचे मोफत मास टेस्टिंग सुरू करण्यात येणार आहे. धारावीतील ८० टक्के लोकसंख्या सार्वजनिक शौचालये वापरते, त्यामुळे दिवसातून ५ ते ६ वेळा सार्वजनिक शौचालयाचे सॅनिटायझेशन करण्यात येईल. धारावीत सुमारे ६ लाख २५ हजारहून अधिक लोकसंख्येची वस्ती आहे. यापैकी साडेचार लाख लोकसंख्या १८ वर्षांवरील आहे. धारावीत बाहेरून येणाऱ्या कामगारांची फ्लोटींग लोकसंख्याही दीड ते दोन लाखांच्या घरात आहे. धारावीतील ४७ टक्के लोकसंख्येचे लसीकरण पूर्ण झाले आहे. आता हेल्थ पोस्टच्या माध्यमातून लसीकरणाचा वेग वाढवण्यावर भर दिला जाणार आहे. त्यासाठी मोबाइल व्हॅन व्हॅक्सिनेशन कार्यक्रमाद्वारे धारावी लसवंत केली जाणार आहे. लसीकरणासाठी धारावीतील लोकांचे प्रबोधन आणि जनजागृती करण्यात येईल. लसीकरणाचा दुसरा डोस घेण्याकरिता असणाऱ्या अडचणी दूर करण्यात येतील. कोविड वॉर्ड वॉर रुमकडे दररोज हाय रिस्क, अॅट रिस्क आणि इतर देशांमधून येणाऱ्या प्रवाशांची माहिती देण्यात येते. यामध्ये धारावीतील प्रवासी आढळल्यास त्यांना ७ दिवस गृहविलगीकरणात ठेवले जाते, तसेच त्यांची वेळोवेळी चाचणी केली जाते. धारावीतील ३५० क्लिनीकची धारावी वॉरियर्सची टीम पुन्हा उभी करून प्रशासन काम करणार आहे.