ओमिक्रॉनमुळे म्हसा यात्रा अखेर रद्द; व्यावसायिक, भाविकांमध्ये नाराजी

मुरबाड – कोरोना तसेच ओमिक्रॉनने डोके वर काढल्याने खबरदारीचा उपाय म्हणून म्हसा यात्रा या वर्षीही रद्द केली असल्याची माहिती तहसीलदार संदीप आवारी यांनी दिली. ही यात्रा रद्द झाल्याने या यात्रेत होणारी कोट्यवधी रुपयांची उलाढाल थंडावणार असल्याने छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. आमदार किसन कथोरे यांच्या उपस्थितीत सोमवार, ३ जानेवारी रोजी झालेल्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
गेली दोन वर्षे कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे म्हसा यात्रा होऊ न शकल्याने यंदा तरी ही यात्रा होणार की नाही, याबाबत चर्चा रंगत होत्या. गेल्या काही दिवसांत कोरोनाची लाट महाराष्ट्रात ओसरल्याने या वर्षी म्हसा यात्रा होणार असे संकेत मिळू लागले होेते. त्यामुळे यात्रेकरू व व्यावसायिकांमध्ये काहीसे आनंदाचे वातावरण पसरले होते. सलग १५ दिवस चालणाऱ्या या यात्रेत लोकनाट्य, मौत का कुवा, रेकॉर्ड डान्स, जादूचे प्रयोग, उंच पाळणे, अशी अनेक मनोरंजनाची साधने उपलब्ध असतात. त्यासाठी देशभरातील विविध ठिकाणचे व्यावसायिक व्यवसायासाठी या यात्रेला आवर्जून हजेरी लावतात. यासोबतच मिठाईची दुकाने, प्रसादाची दुकाने, खानावळी, वडापावच्या टपऱ्या, सरबताच्या गाड्या या यात्रेत सर्वत्र दिसून येतात. या यात्रेला हजेरी लावणाऱ्या भाविकांची संख्या त्या मानाने मोठ्या प्रमाणात असल्याने दररोज येथे या सर्व छोट्या-मोठ्या व्यावसायिकांची चांगलीच कमाई होते, मात्र गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या संकटामुळे ही यात्रा रद्द होत असल्याने एकीकडे या छोट्या-मोठ्या व्यावसायिकांचा, तर दुसरीकडे यात्रेनिमित्त येणाऱ्या भाविकांचा चांगलाच हिरमोड झाल्याचे दिसून आले आहे.
म्हसा यात्रा ही तब्बल दोन शतकांची परंपरा असलेली महाराष्ट्रातील एकमेव यात्रा आहे. या यात्रेत मुरबाड तालुक्यातीलच नव्हे, तर महाराष्ट्रातून हजारो व्यावसायिक व्यवसायानिमित्त तर विविध ठिकाणचे भाविक म्हसोबा देवाला नवस बोलण्यासाठी व नवस फेडण्यासाठी येत असतात. या यात्रेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ही यात्रा खिल्लारी बैलांच्या खरेदी-विक्रीसाठी देशभरात प्रसिद्ध असल्याने या यात्रेत कोट्यवधी रुपयांची आर्थिक उलाढात होत असते.

 

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …