दिल्ली दुसºया क्रमांकावर
१५ दिवसांत ११ राज्यांमध्ये शिरकाव
एकूण रुग्णसंख्या १११
नवी दिल्ली – दक्षिण आफ्रिकेत प्रथमच सापडलेल्या ‘ओमिक्रॉन’ या कोरोना व्हायरसचा नवीन व्हेरिएंट भारतात ही कहर माजवत आहे. शुक्रवारी ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या रुग्णांची संख्या १००च्या पुढे गेली आहे. एकाच दिवसात ओमिक्रॉनची २६ प्रकरणे नोंदवण्यात आली, ही चिंतेची बाब आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानेही लोकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला दिला आहे.
कर्नाटकात पहिल्या प्रकरणाची नोंद झाल्यानंतर अवघ्या १५ दिवसांनी, ११ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ओमिक्रॉन प्रकरणांची संख्या १११ वर पोहोचली आहे. महाराष्ट्रात बाधितांची संख्या ४० आणि दिल्लीत २२ झाली आहे. तेलंगणा आणि केरळमधून प्रत्येकी दोन आणखी रुग्ण आल्याने संक्रमितांची संख्या अनुक्रमे आठ आणि सात झाली आहे.
आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, गेल्या २० दिवसांपासून कोविड संसर्गाची दैनंदिन प्रकरणे १० हजारांपेक्षा कमी आहेत, मात्र ओमिक्रॉनची वाढती प्रकरणे पाहता सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.
ओमिक्रॉनची महाराष्ट्रात सर्वाधिक ४० प्रकरणे आहेत. शुक्रवारी राज्यात ८ नवीन रुग्ण आढळले. ओमिक्रॉनच्या ८ नवीन रुग्णांपैकी ६ पुण्यात आणि प्रत्येकी एक मुंबई आणि कल्याण-डोंबिवलीत आढळून आले आहेत. राज्याच्या आरोग्य विभागाचे म्हणणे आहे की, आज आलेल्या नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ व्हायरोलॉजीच्या अहवालानुसार राज्यात ओमिक्रॉनचे ८ नवीन रुग्ण आढळले आहेत. ओमिक्रॉनच्या रुग्णांच्या संख्येत दिल्ली दुसºया क्रमांकावर आहे. शुक्रवारी १२ नवीन रुग्ण आढळल्याने बाधितांची संख्या २२वर पोहोचली आहे. दरम्यान दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनी सांगितले की, २२ पैकी १० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. लोकनायक रुग्णालयाच्या वरिष्ठ डॉक्टरांनी सांगितले की, बहुतांश रुग्णांचे लसीकरण करण्यात आले असून, त्यांना संसर्गाची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. या रुग्णालयात ओमिक्रॉन रुग्णांवर उपचार आणि रुग्णांच्या विलिगीकरणासाठी विशेष सुविधा तयार करण्यात आली आहे.
केंद्रीय आणि राज्य अधिकाºयांच्या म्हणण्यानुसार, यापैकी महाराष्ट्रात ४०, दिल्लीत २२, राजस्थानमध्ये १७, कर्नाटकात ८, तेलंगणात ८, गुजरातमध्ये ५, केरळ, आंध्र प्रदेश, चंदिगड, तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये ७ आहेत. एकामागून एक प्रकरणे समोर येत आहेत. देशातील ओमिक्रॉनची पहिली दोन प्रकरणे २ डिसेंबर रोजी कर्नाटकात आढळून आली होती.