ओमिक्रॉनची भीती?; लसीकरणात १६ टक्क्यांनी वाढ

नवी दिल्ली – जगभरात कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटने चिंता वाढवली आहे. ओमिक्रॉनचा प्रसार वेगाने होतो, अशी माहिती तज्ज्ञांनी दिली असली, तरी त्याबद्दल अद्याप संशोधन सुरू आहे, मात्र जेव्हापासून ओमिक्रॉनबद्दल विविध बातम्या येऊ लागल्या आहेत, तेव्हापासून देशात लसीकरणात वाढ झाली आहे. ओमिक्रॉनच्या भीतीमुळे नागरिक लसीकरण केंद्रात जाऊन लस टोचवून घेत आहेत.
लसीकरण डेटावर नजर टाकल्यास असे दिसून येते की, गेल्या १३ दिवसांत त्याच्या मागच्या १३ दिवसांच्या तुलनेत दुसºया डोसच्या वापरामध्ये जवळपास १६ टक्क्यांनी वाढ झाली आहे, तर एकूण लसीकरणातही १५ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. कोवीन डॅशबोर्डवरील आकडेवारी दर्शवते की, १२ ते २४ नोव्हेंबरदरम्यान ५ कोटी ८७ लाख २०,७३८ जणांना लसीचा दुसरा डोस दिला गेला होता, तर ही संख्या २५ नोव्हेंबर आणि ७ डिसेंबरदरम्यान ६ कोटी ८८ लाख ९१,९१३ वर पोहोचली. म्हणजेच एकूण १५.९ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली. याच कालावधीत एकूण लसीकरणात सुमारे १५.२ टक्क्यांनी वाढ झाली, जी १२-२४ नोव्हेंबरदरम्यान ८ कोटी ५४ लाख ८७,७६९ वरून २५ नोव्हेंबर ते ७ डिसेंबरदरम्यान ९ कोटी ९५ लाख ५४,१९२ पर्यंत वाढली.
कोरोनाचा ओमिक्रॉन व्हेरिएंट २५ नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेत सापडला. या प्रकारामुळे कोरोनाचा प्रसार वेगाने होतो, त्यामुळे जगभरात चिंतेचे वातावरण तयार झाले आहे. कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटपेक्षा ओमिक्रॉनमध्ये ५० पेक्षा जास्त म्युटेशन झाले असून, तो जास्त वेगाने प्रसारित होतो, असे म्हटले जाते आहे.
ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या विषाणूच्या भीतीमुळे गेल्या आठवडाभरात लस घेण्यासाठी नागरिकांचा प्रतिसाद वाढला आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर ओसरलेला लसीकरणाचा जोर पुन्हा वाढताना दिसत आहे. ओमिक्रॉन विषाणूच्या भीतीमुळे लसीकरणाचा वेग वाढत आहे, तसेच आता घरोघरी लसीकरणाचा पाठपुरावा केला जात असल्यामुळे लसीचा दुसरा डोस न घेतलेले लोक लस घेत आहेत, अशी माहिती आरोग्य आयुक्तालयाच्या संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी दिली.

About Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …