- हा आहे ॲक्शन प्लॅन
मुंबई – ओमिक्रॉनचा आगामी काळातील धोका लक्षात घेता मुंबई महापालिकेने तातडीने खबरदारीच्या उपाययोजना राबवायला सुरुवात केली आहे. अत्यंत धोकादायक असलेल्या देशांतून येणाऱ्या प्रवाशांवर बारकाईने नजर ठेवली जात असून, महापालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी एक अॅक्शन प्लॅन तयार केला आहे. परदेशातून येणाऱ्यांसाठी हा पंचसूत्री अॅक्शन प्लॅन तयार केला आहे. शनिवारी याची माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर याबाबत म्हणाल्या की, कोणत्याही सोसायटीत बाहेरील कुणी व्यक्ती आल्यास, त्यावर नजर ठेवावी. त्या व्यक्तीने क्वारंटाइनच्या सर्व नियमांचे पालन करावे. सध्या मुंबईत ओमिक्रॉनचा एकही रुग्ण आढळलेला नाही, पण असा रुग्ण यापुढे आढळला, तर धोकादायक ठरू शकते. त्यामुळे कोरोना नियमांचे कठोरतेने पालन करणे गरजेचे आहे. काही दिवसांपूर्वी मुंबई महापालिकेने मॉल, रेस्टॉरंट, रेल्वे, सार्वजनिक वाहतुकीसाठी कोरोना लसींचे दोन्ही डोस घेतलेल्या व्यक्तींनाच परवानगी मिळेल, असे आदेश दिले होते. अशा ठिकाणी लस न घेतलेली व्यक्ती आढळल्यास संबंधित संस्थेकडून १० हजार रुपयांचा दंड वसूल केला जाईल. किशोरी पेडणेकर म्हणाल्या, बीएमसीकडे सध्या लसींचा पुरेसा स्टॉक उपलब्ध आहे. त्यामुळे लसीकरणाचे दोन्ही डोस पूर्ण करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
काय आहे अॅक्शन प्लॅन?
- विमानतळ सीईओकडून हाय रिस्क देशांतून येणाऱ्या प्रवाशांची यादी आपत्कालीन कक्षाला पाठवली जाणार.
- प्रवाशांची यादी सोपी व्हावी, यासाठी सॉफ्टवेअरची निर्मिती.
- ही यादी आपत्कालीन कक्षाकडून मुंबई महापालिकेच्या २४ वॉर्डंतील वॉररूमला प्रवाशांच्या पत्त्यासह पाठवली जाणार.
- वॉररूममधून प्रवाशांशी सतत ७ दिवस संपर्क ठेवण्यात येणार आहे.