ठळक बातम्या

ऑस्ट्रेलिया-इंग्लंडसारखी द.आफ्रिकेची स्थिती करणार : ‘टीम इंडिया’ ची गर्जना!

जोहान्सबर्ग – दक्षिण आफ्रिकेविरुद्ध येत्या २६ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेत भारताचे वेगवान गोलंदाज आपली चांगली कामगिरी कायम ठेवून, प्रत्येक कसोटी सामन्यात २० विकेट्स मिळवून देतील, असा विश्वास भारताचा मध्यल्या फळीतील फलंदाज चेतेश्वर पुजाराने व्यक्त केला आहे. दक्षिण आफ्रिकेत दाखल झाल्यानंतर टीम इंडियाने तिथल्या वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी तशा पद्धतीचा सराव सुरू केला आहे. फलंदाजांनी नेटमध्ये शनिवारी सराव केला.
आमचे वेगवान गोलंदाज आमचे बलस्थान आहे. इथले वातावरण, परिस्थितीचा फायदा उचलून ते आम्हाला प्रत्येक कसोटीत २० विकेट्स मिळवून देतील, असा विश्वास पुजाराने व्यक्त केला. आम्ही परदेशात खेळतो, तेव्हा आमचे वेगवान गोलंदाज हा दोन संघांमधला फरक असतो, असे पुजाराने म्हटले आहे. तुम्ही ऑस्ट्रेलिया, इंग्लंडमधली आमची कामगिरी पाहिली, तर विशेष करून आमच्या वेगवान गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली आहे. दक्षिण आफ्रिकेतही ते हेच सातत्य कायम राखतील, असा विश्वास पुजाराने व्यक्त केला.
चेतेश्वर पुजारा भारताचा मधल्या फळीतील फलंदाज असून त्याने ९२ कसोटी सामन्यांत ६५८९ धावा केल्या आहेत. सध्या पुजाराच्या बॅटमधूनही धावा आटल्या असून आगामी आफ्रिका दौऱ्यात त्याला सूर सापडेल, अशी अपेक्षा आहे. पुजारा कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाजी करण्यात पारंगत आहे. भारतीय संघ या दौऱ्यात कुठलाही सराव सामना खेळणार नाही. कोरोनाच्या ओमिक्रॉन या नव्या व्हेरिएंटचे सावट या दौऱ्यावर आहे. भारतात आम्ही कसोटी सामने खेळलोय, ही चांगली बाब आहे, असे पुजाराने सांगितले.
सर्वच खेळाडू टचमध्ये असून जेव्हा तयारीचा भाग येतो, त्यावेळी आमचा सपोर्ट स्टाफ उत्तम आहे. ते नेहमी आम्हाला मदत करतात. पहिल्या कसोटी सामन्याआधी आमच्या हातात पाच ते सहा दिवस आहेत, असे पुजारा म्हणाला. सेंच्युरीयनवरच्या बॉक्सिंग डे कसोटीआधी मिळालेला १० दिवसांचा वेळ पुरेसा आहे, असे पुजाराने सांगितले.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …