मेलबर्न – तिसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा एक डाव आणि १४ धावांनी पराभव करत अॅशेस मालिका ३-० अशी जिंकली. या कसोटीत ऑस्ट्रेलियाकडून पदार्पण करणाऱ्या स्कॉट बोलँडने कमालच केली. पहिल्या डावात फक्त १ बळी घेणाऱ्या स्कॉट बोलँडने दुसऱ्या डावात फक्त चार षटके टाकत सात धावांत सहा फलंदाजांना तंबूत धाडले. त्याच्या या भेदक माऱ्यामुळे इंग्लंडला एक डाव आणि १४ धावांच्या नामुष्कीजनक पराभवाला सामोरे जावे लागले.
पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत २-० ने पिछाडीवर असलेला इंग्लंडचा संघ तिसऱ्या कसोटीत दमदार कामगिरी करेल असे वाटले होते, मात्र इंग्लंडचा पहिला डाव १८५ धावांत संपुष्टात आला, तर ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावात २६७ धावांवर रोखत इंग्लंडने पुनरागमनाचे संकेत दिले होते; पण स्कॉट बोलँडने त्यावर पाणी फेरले. त्याने भेदक गोलंदाजी करत इंग्लंडचा दुसरा डाव केवळ ६८ धावांत गुंडाळला. परिणामी, ऑस्ट्रेलियाने एक डाव आणि १४ धावांनी इंग्लंडवर विजय मिळवला.
तिसऱ्या दिवशी इंग्लंडने ४ बाद ३१ धावांवरून खेळ सुरू केला;पण इंग्लंडने उर्वरित ६ फलंदाज केवळ ३७ धावांत गमावले. जो रूट आणि बेन स्टोक्स या विश्वासू जोडीने तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू केला. स्टोक्सच्या (११) यष्ट्या उद्ध्वस्त करत मिचेल स्टार्कने इंग्लंडला सकाळच्या अर्धा तासातच पहिला धक्का दिला. जॉनी बेअरस्टोचे (५) अपयश कायम होते. त्याचा जोडीदार व यष्टिरक्षक जोस बटलरही (५) कामगिरी उंचावण्यास कमी पडला. बेअरस्टोच्या रूपात इंग्लंडने सहावा फलंदाज ६० धावांवर गमावला. कर्णधार जो रूटच्या खांद्यावर या परिस्थितीवर जबाबदारी येऊन पडली होती; पण बोलँडने त्याचा काटा काढला. ४ चौकारांनी त्याला २८ धावा काढता आल्या. इंग्लंडने त्यानंतर उर्वरित ३ फलंदाज ७ धावांत गमावले. बोलँडच्या कामगिरीचे विश्लेषण ४-१-७-६ असे होते. त्याला साथ देत स्टार्कने ३ आणि कॅमेरून ग्रीनने १ बळी घेतला. दोन्ही डावांत सात बळी घेणारा स्कॉट बोलँडला सामनावीराचा किताब देण्यात आला. उभय संघांतील चौथा कसोटी सामना ५ जानेवारीपासून सिडनीत खेळवण्यात येईल. न्यू साऊथवेल्समध्ये कोरोना संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्यानंतर एक आठवड्याच्या विलगीकरणात राहावे लागते. तसेच न्यू साऊथवेल्समध्ये सोमवारी तब्बल ६ हजार कोरोना रुग्ण आढळले. कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षणीय आहे; पण त्याचा कोणताही परिणाम ॲशेस मालिकेवर होणार नाही, असे न्यू साऊथवेल्सचे आरोग्यमंत्री ब्राड हाजार्ड यांनी स्पष्ट केले.