ठळक बातम्या

ऑस्ट्रेलियाचा ॲशेसमधील दबदबा कायम

  •  इंग्लंड १८५ धावांत गारद

मेलबर्न – कर्णधार पॅट कमिन्स व स्पिनर नाथन लियोन यांच्या प्रत्येकी तीन विकेटच्या मदतीने ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला तिसऱ्या ॲशेस कसोटी क्रिकेट सामन्याच्या पहिल्या दिवशी रविवारी येथे पहिल्या डावात १८५ धावांत गारद केले. याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने एक बाद ६१ धावा साकारल्या असून, ते इंग्लंडपासून १२४ धावांनी पिछाडीवर आहेत.
डेव्हिड वॉर्नर (३८) विश्वसनीय सुरुवातीनंतर पहिल्या दिवसाच्या अखेरच्या क्षणी माघारी परतला. जेम्स अँडरसन (१४ धावा एक विकेट)च्या गोलंदाजीवर जॉक क्रॉलीने गलीमध्ये त्याचा उत्तम झेल टिपला. दिवसाचा खेळ संपेपर्यंत दुसरा सलामी फलंदाज मार्कस हॅरिस २० धावांवर खेळत आहे, तर नाइटवॉचमन लियोनने अद्याप खाते खोलले नाही. त्याआधी कमिन्स (३६ धावा तीन विकेट)ने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला व इंग्लंडला बॅकफूटला टाकले, तर फिरकीपटू लियोन (३६ धावा तीन विकेट) याने अखेरची फळी उद्ध्वस्त केली. मिशेल स्टार्कने ५४ धावा देत दोन विकेट मिळवल्या, कॅमरन ग्रीन व आपला पहिला कसोटी सामना खेळणारा स्कॉट बॉलँडला प्रत्येकी एक विकेट मिळाली. इंग्लंडसाठी सुरुवात चांगली राहिली नाही. लंचपर्यंत त्यांनी तीन विकेट ६१ धावांत गमावल्या. त्यानंतर इंग्लंडने दुसऱ्या सत्रात तीन विकेट झटपट गमावल्या, ज्यात कर्णधार जो रुट (५०) व धोकादायक बेन स्टोक्स (२५) च्या विकेटचा समावेश होता. ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या सत्रात उरलेले चार विकेट मिळवत आपला दबदबा कायम राखला. पावसामुळे खेळ अर्धा तास उशिरा सुरुवात झाला. कमिन्सने दुसऱ्याच षटकात हसीब हमीद (शून्य)ला यष्टीरक्षक ॲलेक्स कॅरीकरवी झेलबाद केले. त्यानंतर कमिन्सने आठव्या षटकात दुसरा सलामी फलंदाज क्रॉली (१२)ला गलीत झेल देण्यास भाग पाडले. डेव्हिड मलान (१४)ने कर्णधार जो रुटसोबत तिसऱ्या विकेटसाठी ४८ धावा जोडल्या. कमिन्सने लंचआधी अखेरच्या षटकात मलानला पहिल्या स्लिपमध्ये वॉर्नरकरवी झेलबाद केले. जगातील दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज रुटने ७६ चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले, पण त्यानंतर स्टार्कच्या ऑफ स्टम्पबाहेर जाणारा चेंडू तो कॅरीला देऊन बसला, ज्यामुळे इंग्लंडची अवस्था ४ बाद ८२ धावा झाली. रुट जर इंग्लंडच्या दुसऱ्या डावात १०९ धावा करतो, तर तो एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनेल. सध्या हा रेकॉर्ड पाकिस्तानचा मोहम्मद युसूफच्या नावे आहे, ज्याने २००६ मध्ये १७८८ धावा केल्या होत्या. रुटने २०२१ मध्ये एकूण १६८० धावा केल्या असून एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावा करणारा तो कर्णधार बनला आहे. रुटने दक्षिण आफ्रिकेचा ग्रीम स्मिथ (२००८ मध्ये १६५६ धावा)च्या विक्रमाला पिछाडीवर टाकले. स्टोक्सने आक्रमक भूमिका बजावण्याचा प्रयत्न केला, पण ग्रीनच्या चेंडूचा कट लागत त्याने गलीमध्ये कॅच दिला. जॉस बटलर (तीन)ने चहापानाच्या विश्रांतीआधी लियोनच्या गोलंदाजीवर विचित्र शॉट खेळत डीप मिडविकेटला झेल सोपवला. आपल्या स्थानिक मैदानात कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा बोलँडने मार्क वुड (सहा) ला पायचित करत आपला पहिला विकेट केला. जॉनी बेअरस्टॉने ३५ धावा केल्यानंतर स्टार्क च्या गोलंदाजीवर गलीमध्येच झेल दिला. लियोनने अखेरचे फलंदाज जॅक लीच (१३) आणि ऑली रॉबिन्सन (२२) यांना बाद केले. ऑस्ट्रेलिया पाच सामन्यांच्या मालिकेत सध्या २-० असे आघाडीवर आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …