मुंबई – मागील तीन आठवड्यांपासून सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्याचा तिढा सोडविण्यासाठी राज्य सरकारने बुधवारी मोठ्या पगारवाढीचा प्रस्ताव ठेवला. बुधवारी सह्याद्री अतिथीगृहात परिवहन मंत्री अनिल परब, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत आणि कर्मचाऱ्यांच्या वतीने सदाभाऊ खोत व गोपीचंद पडळकर यांच्यासह कामगार प्रतिनिधींमध्ये चर्चेच्या दोन फे ऱ्या पार पडल्या. यावेळी झालेल्या चर्चेत कर्मचाऱ्यांना एसटीच्या इतिहासातील सर्वात मोठी पगारवाढ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. तशी घोषणा परिवहन मंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन केली. त्यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत उपस्थित होते. एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात वाढ केल्याची माहिती परब यांनी यावेळी दिली.
राज्य सरकारच्या या प्रस्तावाची घोषणा करण्याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला. या दोघांचीही प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर परब यांनी खोत व पडळकर यांच्या उपस्थितीत प्रसारमाध्यमांसमोर त्याबाबतची घोषणा केली. कर्मचाऱ्यांनी त्वरीत (गुरुवारी सकाळी ८ पासून) कामावर रूजू व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले. संप काळात कर्मचाऱ्यांवर करण्यात आलेली निलंबनाची आणि सेवासमाप्तीची कारवाईही मागे घेतली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राज्य सरकारच्या प्रस्तावानुसार १ ते १० वर्षे सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात ५ हजारांची वाढ केली जाणार असून, त्यामुळे ज्यांचे मूळ वेतन १२ हजार ८० होते, त्यांचे वेतन आता १७ हजार ३९५ रुपये होणार आहे. ज्यांचे पूर्ण वेतन जे १७ हजार ८० रुपये होते ते आता २४ हजार ५९४ रुपये झाले आहे. साधारण ७ हजार २०० रुपयांची म्हणजे एकूण ४१ टक्के वाढ केली गेली आहे. १० ते २० वर्षे सेवा केलेल्या कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात ४ हजार रुपयांची वाढ प्रस्तावित असून, ज्यांचा पगार १६ हजार रुपये होता, त्यांचा पगार २३ हजार ४० रुपये झाला आहे. २० वर्षे आणि त्याहून अधिक सेवा झालेल्यांना २ हजार ५०० रुपयांची वाढ देण्यात आली असून, ज्यांचे मूळ वेतन २६ हजार रुपये होते त्यांचा पगार आता २८ हजार ८०० रुपये झाला आहे. ज्यांचे स्थूल वेतन ३७ हजार ४४० रुपये होते, त्यांचा पूर्ण पगार आता ४१ हजार ४० झाला आहे. ज्यांचे मूळ वेतन ३७ हजार आणि स्थूल वेतन ५३ हजार २८० रुपये होते. त्यांचे मूळ वेतन ३९ हजार ५०० होईल, तर सुधारित वेतन ५६ हजार ८८० रुपये होईल.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …