बुलढाणा – राज्यभरात सुरू असलेल्या एसटी महामंडळाच्या आंदोलनात सहभाग घेतलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव आगारातील सहाय्यक मेकॅनिक पदावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याने मंगळवारी रात्री विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. दरम्यान त्याला तात्काळ खामगाव येथील सामान्य रुग्णालयातील अति दक्षता विभागात उपचारासाठी भरती करण्यात आले. सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे. आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या कर्मचाऱ्याचे नाव विशाल प्रकाश अंबलकार (२९) असे असून, माटरगाव येथील रहवासी आहे.
महाराष्ट्रात एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांनी ठिकठिकाणी विविध मागण्यांसाठी हजारो कर्मचाऱ्यांसह शांततेत आंदोलन सुरू केलेले आहे, परंतु या आंदोलनाची महाराष्ट्र शासनाने अद्यापही गंभीर दखल घेतली नाही व कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या नाही. उलट सरकारने एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबनाचा बडगा उगारला, म्हणून एसटी कर्मचाऱ्यांचा समतोल बिघडत चालला आहे. दरम्यान खामगाव आगारातील सहाय्यक, मलादेखील निलंबित करतील या विचारामुळे गेल्या दोन दिवसांपासून मेकॅनिक विशाल यांची मानसिक परिस्थिती बिघडत चालली होती. याच विवंचनेतून विशाल यांनी आपल्या घरी माटरगांव येथे जाऊन विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला, अशी माहिती मिळत आहे.