एसटी महामंडळाकडून संपकऱ्यांवर कारवाईला सुरुवात; आतापर्यंत ३७६ कर्मचाऱ्यांचे निलंबन
मुंबई – महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन महामंडळाचे (एमएसआरटीसी) राज्य शासनात विलिनीकरण करा, ही मागणी घेऊन राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा बडगा उगारला आहे. यासाठी समिती स्थापन करून त्यावर तोडगा काढण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत; मात्र कर्मचारी आपल्या मागण्या घेऊन आंदोलन करत असल्याने आता एसटी महामंडळाकडून कठोर कारवाईची भूमिका घेण्यात आली. महामंडळाने संपावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांविरोधात निलंबनाच्या कारवाईला सुरुवात केली आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा राज्यभरात संप सुरू आहे. याविरोधात आता एसटी महामंडळाने मोठी कारवाई सुरू केली आहे. त्यानुसार महामंडळाने संपावर गेलेल्या ३७६ कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. यामध्ये राज्यातील ४५ आगारांतील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. राज्य सरकारने जीआर काढूनही एसटी संघटनांनी संप मागे घेतला नाही, त्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचे समजते.
- चंद्रपुरात घडली पहिली कारवाई
एसटी कामगारांच्या निलंबनाची पहिली कारवाई मंगळवारी चंद्रपुरात १४ संपकरी कर्मचाऱ्यांच्या निलंबनाने करण्यात आली. चंद्रपूर जिल्ह्यातील राजूरा आगार, चंद्रपूर आगार आणि विभागीय कार्यशाळा या ३ घटकांतील कर्मचाऱ्यांचा त्यात समावेश आहे. दरम्यान, एसटी महामंडळ संपाबाबत अवमान याचिका दाखल करणार असल्याची माहितीदेखील मंगळवारी परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली. दरम्यान, दिवाळीपूर्वी राज्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या उपोषणाला सुरुवात झाली होती, तर चंद्रपुरातून अनिश्चित कालीन संपाची घोषणा झाली होती. त्यानंतर मंगळवारी चंद्रपुरातील १४ एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे एसटी कर्मचाऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. आयुष्यभर शिस्तीत सेवा केल्याचे फळ दिल्याची संतप्त प्रतिक्रिया या कर्मचाऱ्यांनी दिली. ३६ एसटी कर्मचारी हुतात्मे झाले. त्याच्यापुढे हे निलंबन शुल्लक असल्याचेही एसटी कर्मचारी म्हणत आहेत.