एसटी कामगारांनी पगारावर समाधानी राहावे, संप म्हणजे भिंतीवर डोके आपटून घेण्यासारखे – संजय राऊत

औरंगाबाद – गेल्या तीन आठवड्यांपासून आंदोलन करणाऱ्या संपकरी कर्मचाऱ्यांवर एसटी महामंडळाने कारवाई सुरू केली आहे. या संपावर अद्यापही तोडगा निघालेला नाही. यातच आता शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या सुरू असलेल्या संपाबाबत भाष्य केले आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा संप म्हणजे भिंतीवर डोके आपटून घेण्यासारखे आहे, असे वक्तव्य राऊत यांनी केले आहे.
एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करा, या प्रमुख मागणीसाठी एसटी कर्मचारी संपावर गेले आहेत. यासंदर्भात संजय राऊत यांनी औरंगाबाद येथील एका कार्यक्रमात प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाबाबत हळूहळू मार्ग निघतील. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आज असते, तर त्यांनीही हेच सांगितले असते, असे राऊत यांनी म्हटले आहे. एसटी संपाबाबत विरोधी पक्षाला नाट्य पुरस्कार देऊ, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला आहे. शिवसेनेची कामगारांना सतत सहानुभूती आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी पगार मिळतो आहे, त्यावर समाधानी राहावे. एसटी कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी राज्य सरकारने एसटी महामंडळाला आतापर्यंत २ हजार कोटी रुपये दिले आहेत. ही लहान गोष्ट नाही. यापुढेही राज्य सरकार एसटी महामंडळाला पैसे देईल, असे सांगत एसटी कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या कायद्याच्या चौकटीत बसत नाहीत आणि त्यासाठी तुम्ही तुमचे रक्त आटवणे हे भिंतीवर डोके आपटून घेण्यासारखे असते. शिवसेनेची कामगारांना सतत सहानुभूती आहे आणि ती यापुढेही राहील, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …