* राज्यातील ५९ एसटी डेपोंमध्ये कामकाज बंद
* एसटी कामगारांची सुनावणीकडे पाठ, आज पुन्हा सुनावणी
मुंबई – एसटी महामंडळाचे (एमएसआरटीसी) शासनामध्ये विलिनीकरण करण्यात यावे, या प्रमुख मागणीसह अनेक मागण्यांसाठी एसटी महामंडळाच्या २५० डेपोंपैकी ५९ डेपोंतील कर्मचाऱ्यांनी ऐन दिवाळीत संप पुकारला आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत औद्योगिक न्यायालयाने दिलेल्या निर्देशाची मुंबई उच्च न्यायालयानेही गंभीर दखल घेतली आहे. सणासुदीच्या काळात या संपामुळे प्रवाशांचे मात्र हाल होत आहेत. त्यामुळे तुर्तास एसटी कर्मचाऱ्यांनी संपावर न जाण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. आज यावर पुन्हा हायकोर्टात सुनावणी होणार आहे.
दरम्यान, संपाविरोधात एसटी महामंडळाने हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. यावर गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली; मात्र या सुनावणीकडे एसटी कर्मचाऱ्यांनी पाठ फिरवली. यामुळे शुक्रवारी पुन्हा सुनावणी होणार आहे. तुर्तास एसटी कर्मचाऱ्यांनी संपावर न जाण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. कनिष्ठ वेतनश्रेणी कर्मचारी संघटनेचे नेते अजयकुमार यांना नोटीस जारी करण्याचे निर्देश देण्यात आहेत. निर्देशांनंतरही कामबंद करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कोर्टाचा अवमान केल्याबद्दल कारवाई का करू नये?, अशी विचारणा करत हायकोर्टाकडून नोटीस जारी करण्यात आली आहे. कोर्टाने नोटीस जारी केली असली, तरीही राज्यातील कर्मचाऱ्यांनी संप चालूच ठेवला आहे.
एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा पुन्हा संप सुरू झाल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. एसटी महामंडळाचे शासनामध्ये विलिनीकरण करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी ऐन दिवाळीत संप पुकारला आहे, तसेच ही काळी दिवाळी असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. या आंदोलनादरम्यान कर्मचाऱ्यांनी राज्य सरकार, परिवहन मंत्री अनिल परब, तसेच एसटी महामंडळाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. एसटी महामंडळाच्या धोरणामुळे अनेक कर्मचारी आत्महत्या करत असल्याचा आरोपही यावेळी कर्मचाऱ्यांनी लावला आहे, तर ही दिवाळी आमची काळी दिवाळी असल्याचेदेखील कर्मचारी म्हणाले. जोपर्यंत एसटी महामंडळाचे शासनामध्ये विलिनीकरण करण्यात येत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहील, अशी भूमिका एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी घेतली आहे, तसेच एसटी महामंडळाच्या या संपामुळे अनेक प्रवाशांचे हाल झाले आहेत, तर दुसरीकडे रिक्षा चालक भाव वाढ करून लूट करत असल्याने प्रवासी त्रस्त झाले आहेत.