पुणे – एसटी महामंडळाचा राज्य सरकारमध्ये समावेश करण्याच्या मागणीसाठी राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. ठिकठिकाणी सुरू असलेल्या आंदोलनाला महाराष्ट्र नवनिर्माण सेना व वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिला आहे.
अनेक ठिकाणी एसटी कर्मचाऱ्यांनी राज्य शासनाच्या कामगार विरोधी धोरणास वैतागून स्वत:चे जीवन संपवले आहे. राज्य सरकार व विरोधी पक्ष हे मात्र एसटी कर्मचाऱ्यांच्या जीवाशी खेळत आहेत. त्यांच्या मागण्या मान्य करायला तयार नाही. पाच वर्षे सत्तेत असताना भाजप, शिवसेना या पक्षाने एसटी कर्मचाऱ्यांची कोणतीही दाखल घेतली नाही. आता सत्तेत बसलेल्या महाविकास आघाडी सरकारने कामगारांच्या या प्रश्नापासून पळ काढला आहे. एसटी आगारात सुरू असलेल्या कर्मचाऱ्यांच्या आंदोलनास दडपण्यासाठी कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याच्या, नोकरीवरून निलंबित करण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत; मात्र आम्ही एसटी कर्मचाऱ्यांच्या बाजूने उभे आहोत. असे पत्रक काढत वंचित बहुजन आघाडीने या संपाला पाठिंबा दिला आहे. दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिवाजीनगर बस स्थानकाबाहेरील एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात सहभागी होत, जोरदार घोषणाबाजी केली. प्रवाशांचे हाल होत असताना, शासनाने हा संप चिघळण्याची वाट बघू नये, तसचे कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात असेही पत्रक काढून सांगण्यात आले आहे.