एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील महिलांचा अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

* खासदार नवनीत राणा सहभागी
अमरावती – विलिनीकरणाच्या मुद्यावर गेल्या अडीच महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. कोणत्याही परिस्थितीत एसटी कर्मचारी आंदोलन मागे घेण्यास तयार नाहीत. अशातच बुधवारी अमरावतीत आगारातील एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील महिला रस्त्यावर उतरल्या होत्या. या महिलांनी विलिनीकरणाच्या मागणीसाठी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाकाढला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेयांनी आमच्या मागणीकडे लक्ष देऊन लवकरात लवकर एसटीचे विलिनीकरण करावे, अशी मागणी आंदोलनात सहभागी झालेल्या या महिलांनी केली आहे. या मोर्चामध्ये अमरावतीच्या खासदार नवनीत राणा देखील सहभागी झाल्या होत्या.
अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या मोर्चाला महिलांची मोठी गर्दी होती. या मार्चामध्ये लहान लहान मुलांना घेऊन महिला सहभागी झाल्या होत्या.जवळपास 500 महिला कर्मचारी संपात सहभागी झाल्या होत्या. रस्त्यावर बसून सरकार विरोधात मोठ्याने घोषणाबाजी केली.जोपर्यंत विलिनीकरण होणार नाही तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहणार असल्याचे मोर्चात सहभागी झालेल्या महिलांनी सांगितले. गेल्या अडीच महिन्यांपासून आमच्या कुटुंबारवर संकट आले आहे. राज्य सरकार आमच्याकडे लक्ष देत नाही. आमची पगारवाढ झाली नाही तर चालेल, पण आमचे विलिनीकरण झालेच पाहिजे. सरकारला जागे करण्यासाठी आम्ही जिजाऊंच्या जयंती दिवशी संप करत आहेत. विलीनीकरणाची आमची मागणी सरकारने मान्य केलेली नाही त्यामुळे संप मिटलेला नाही असे यावेळी महिलांनी सांगितले. आमच्या मुलाबाळांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे. उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे सरकारने आमच्याकडे लक्ष द्यावे अशी मागणी या महिलांनी केली आहे.
दरम्यान, दोन दिवसाखालीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, परिवहन मंत्री अनिल परब यांची एसटी संघटनांच्या कृती समितीशी बैठक झाली होती.  एसटी कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याचे आवाहन देखील करण्यात आले होते.  विलीणीकरणाबाबतचा मुद्दा न्यायप्रविष्ठ आहे. त्याबाबत समिती नेमली आहे, तो समिती जो निर्णय देऊल तो सरकारला मान्य असेल असेही यावेळी  सांगितले आहे. तसेच तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कामावर रुजू झाल्यावर कोणत्याही कर्मचाऱ्यावर कारवाई होणार नसल्याचे आश्वासन देखील मंर्त्यांनी दिले असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले होते. तरीदेखील कर्मचारी संपावर ठाम असल्याचे चित्र दिसत आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …